जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील महादेव मंदिरात बुधवारी झालेल्या बैठकती कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी एकजुटीची शपथ घेऊन शेतकऱ्यांनी मशाल
पेटविली.
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी वाटपात डाव्या
कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे. या प्रकल्पातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन पारनेर
आणि श्रीगोंदा तालुक्यातच झाले
आहे. डावा कालवा पावणे दोनशे
किलोमीटर लांबीचा आहे व प्रकल्पाचे लाभक्षेत्र जवळपास सत्तर टक्के आहे. दरवर्षी पाणी मात्र तीस टक्केच मिळते. त्यामुळे येथील पिण्याचा व शेतीचा पाणी प्रश्न सतत निर्माण होत आहे. दरवर्षी पिके जळत आहेत. पुणे जिल्ह्याला कमी लाभक्षेत्र असूनही या प्रकल्पातून बेकायदा व बेसुमार पाणी वापर होतो. डाव्या कालव्यातील
शेतकरी मात्र दरवर्षी पाण्याविना
पिके सोडून देतात. पाण्याचे शाश्वत वाटप निश्चित नसल्यामुळे
पिकांचे नियोजन करता येत नाही. त्यामुळे जलसंपत्ती प्राधिकरण व न्यायालय यांच्याकडून लाभक्षेत्रानुसार समान पाणीवाटप निश्चित करून
घेण्याचे ठरले.
त्यासाठी येथील बैठकीत कुकडी पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या संघर्ष समितीमध्ये श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा येथील लाभक्षेत्रातील सर्वांना सामावून घेण्याचा ठराव घेण्यात आला.
लवकरच या लाभक्षेत्र परिसरात
शेतकऱ्यांच्या बैठका घेण्याचे नियोजन ठरले. आंदोलनाला लागणाऱ्या निधी संकलनासाठी लवकरच एक बँक खाते कार्यरत करून ते सार्वजनिक केले जाणार आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती गणेश शेळके, ठकाराम लंके, सुभाष आढाव, राहुल शिंदे, संदीप सालके, गोरख पठारे, पंकज कारखिले, साहेबराव पानगे, कारभारी कोठावळे, पंढरीनाथ कवाष्ठे, मोहन आढाव, मंगेश सालके, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, सुरेश पठारे, प्रसाद शितोळे, लाभेश औटी, संतोष खोडदे, मंगेश वराळ, नवनाथ सालके, कैलास आढाव, जयसिंग सालके, शंकर पठारे, कुंडलिक पठारे, रामदास घावटे, बबन कवाद, कैलास शेळके, बबन सालके, डॉ. आबासाहेब खोडदे, गणेश देशमुख, संपत सालके, संतोष सालके, श्रीधर पठारे, विशाल गायकवाड, मंगेश कार्ले आदींसह शेतकरी उपस्थित होते.
----
न्यायालयीन लढ्यावर भर..
न्यायालयीन लढा उभारूनच आपल्याला न्याय मिळेल यावर मात्र सर्वांनी एकमत नोंदविले. हा लढा बिगर राजकीय असेल. या आंदोलनाला राजकीय लोकांकडून कोणताही मदतनिधी न घेण्याचा ठरावही घेतला आहे. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला न्यायालयीन लढाईसाठी लागणारे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले.
---
..तर संबंधित गुन्हे दाखल करा
माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे म्हणाले, यंदा कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना उशिरा पाणी मिळाले. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले. पाणी उशिरा मिळण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनीच गुन्हे दाखल करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
---
फोटो ओळी
जवळे येथील महादेव मंदिरासमोर कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी हक्काच्या पाण्यासाठी मशाल पेटविली.