चंद्रकांत शेळके
अहमदनगर : नीट परीक्षा न देता वैद्यकीय प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. परंतु हा निर्णय चुकीचा असून भावी दर्जेदार डाॅक्टर घडवायचे असतील तर ‘नीट’द्वारेच वैद्यकीय प्रवेश असावा, अशा प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.
एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीयूएमएस आदी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) परीक्षा दरवर्षी देशभरात एकाच दिवशी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'कडून (एनटीए) घेण्यात येते. यंदाची परीक्षा १२ सप्टेंबर रोजी झाली. या परीक्षेच्या एक दिवस आधी तामिळनाडूतील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचे पडसाद तामिळनाडू विधानसभेत उमटले. त्याचा परिणाम म्हणून नीट परीक्षेतून सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत संमत करण्यात आले. त्यामुळे तेथे आता वैद्यकीय प्रवेश नीट परीक्षेऐवजी बारावी परीक्षेच्या गुणांवर होणार आहेत. याच धर्तीवर इतर राज्यांतही प्रवेश व्हावेत का? नीट रद्द केल्याचा निर्णय योग्य आहे का? याबाबत जिल्ह्यातील काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता तामिळनाडूचा निर्णय चुकीचा असल्याचे सर्वांचे एकमत झाले. नीट परीक्षा देशपातळीवर एकाचवेळी होत असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे समान मूल्यमापन होते. त्यातून सर्वांची गुणवत्ता सिद्ध करता येते. वैद्यकीयसारख्या जोखमीच्या क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध व्हायलाच पाहिजे. त्यासाठी नीट हाच पर्याय असू शकतो. त्याला कोणत्याही सरकारने शाॅर्टकट देऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.
------------
नीट न देता वैद्यकीय प्रवेशाचा तामिळनाडूचा निर्णय अयोग्य आहे. पुढे तो न्यायालयातही टिकणार नाही. वैद्यकीयसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात पाऊल ठेवताना गुणवत्तेशी तडजोड होता कामा नये. नीट परीक्षेद्वारे वैद्यकीय अभ्यासक्रमात एकवाक्यता राहते. तसेच विद्यार्थ्याने बारावी परीक्षा कोणत्याही बोर्डातून दिली असली तरी नीटमधून त्याला समान संधी मिळते. ग्रामीण मुलांमध्येही गुणवत्ता असेल तर ते मागे पडणार नाहीत.
- डाॅ. सुचित तांबोळी, समुपदेशक वैद्यकीय प्रवेश परीक्षा
------------------
तामिळनाडू सरकारचा निर्णय साफ चुकीचा आहे. कोरोनामुळे बारावीची परीक्षा झाली नाही. मग बारावीच्या गुणांवर वैद्यकीयसारख्या जबाबदारीच्या क्षेत्रात प्रवेश देणे संयुक्तिक ठरणार नाही. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नीट आवश्यकच आहे. ग्रामीण भागातील मुलेही आता मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्राला पसंती देत आहेत.
- रवींद्र काळे, नीट परीक्षा मार्गदर्शक
---------------
नीट परीक्षेद्वारेच वैद्यकीय प्रवेश व्हावेत. मुले नीटचा अभ्यास नियोजनपूर्वक वर्षभरापासून करतात. त्यातून समान संधीने गुणवत्ता सिद्ध होऊ शकते.
- साई काळे, विद्यार्थी
-------------
वैद्यकीय प्रवेश ‘नीट’मधूनच व्हायला हवेत. देशपातळीवर एकच परीक्षा असल्याने सर्वांना समान संधी मिळते. दुसरीकडे वैद्यकीय प्रवेशाच्या जागा कमी आहेत, त्या वाढवायला हव्यात.
- ऋग्वेदा कुलकर्णी, विद्यार्थिनी