कर्जत : कर्जत शहरात कोरोना उपचारासाठीच्या आवश्यक चाचण्या सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय शनिवारी पॅथालॉजी लॅब चालकांच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुढाकार घेतला.
तालुक्यातील गंभीर असलेले कोरोना रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अनेकांचा कोरोनाने मृत्यू ओढवत आहे. यातील अनेकांच्या घरची परिस्थिती बेताचीच असते. त्यामुळे उपचाराचा खर्च करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी कोरोनाबाबत करण्यात येणाऱ्या चाचण्या सवलतीच्या दरात कराव्यात, यासाठी चंद्रशेखर यादव यांनी शहरातील १० पॅथालॉजी लॅब चालकांची बैठक घेतली. अतिशय गरीब नागरिक हे सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांना चाचण्यांचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ज्या महत्त्वाच्या दोन चाचण्या आहेत, त्यांचे परीक्षण सरकारी रुग्णालय कर्जत येथे होत नाही. अशा ‘डी डायमर व सिरम फेरीटीन’ या चाचण्या करण्यासाठी सवलत द्यावी, असे आवाहन यादव यांनी केले. त्यावरून लॅब चालकांनी २ हजार ३०० रुपयांच्या चाचण्या १ हजार २०० रुपयांमध्ये करण्याचे मान्य केले.
यावेळी मनोज लातूरकर, बळीराम काकडे, संतोष बालगुडे, दादा पाचर्णे, नंदलाल काळदाते, परबत सुरवसे, युवराज शिंदे, राहुल शेळके, सतीश तनपुरे, मनोज वाघमारे, अजय लांडघुले, रामकृष्ण तापकीर आदी उपस्थित होते.