ऐन दुष्काळात किंवा पाण्याच्या तुटवड्यात बागायत शेतीसाठी वरदान ठरलेल्या शेततळ्यांबाबत आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. शेतकरी जागरूक आणि दक्ष व्हावेत, म्हणून कृषी खात्याने केलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी व्हायलाच हवी; कारण कडक उन्हाळ्यात शेततळ्यांकडील वावर आता वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन अकोले तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी केले आहे.
शेतकऱ्यांकडे अस्तरीकरणासह पाणी भरलेली शेततळी आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांनी याबाबत सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. शेततळ्यास चारीही बाजूंनी फाटकासह तारेचे कुंपण करून शेततळे कुलूपबंद असावे. घराच्या जवळ शेततळे असल्यास घरातील लहान मुले, शालेय अभ्यास करणारे विद्यार्थी, घरातील वयस्कर सदस्य त्या ठिकाणी जाणार नाहीत यावर लक्ष ठेवावे. उन्हाळ्यात पाण्याला स्पर्श करण्याची, पोहण्याची प्रबळ इच्छा मनुष्यास होते. अशा सर्वांना व पोहता न येणाऱ्यांना शेततळ्याकडे जाण्यास प्रतिबंध करावा. ठिबक सिंचनाच्या जुन्या नळ्या अथवा मजबूत आणि टिकाऊ दोरखंडाला मध्ये गाठ मारून अशा नळ्या, दोर शेततळ्याच्या सर्व बाजूंनी काठाला घट्ट बांधून तळ्यात सोडावेत. चारचाकी गाड्यांच्या ट्यूबमध्ये पाणी भरून आणि लहानमोठे ड्रम हवाबंद करून दोरखंडाने बांधून शेततळ्यात सोडावेत.
नायलॉन नेट पूर्णपणे शेततळ्यावर बांधल्यास मासे खाणाऱ्या पक्ष्यांपासून संरक्षण होईलच; तसेच पाण्यात कुणी पडल्यास त्याचाही काहीकाळ आधार घेता येऊ शकतो. संकटकाळी आणीबाणी म्हणून एक मोठा लांब दोर किंवा नाडा शेततळ्यावर कायमस्वरूपी ठेवावा. याशिवाय शेतकऱ्यांना स्वयंस्फूर्तीने सुचतील अशा सर्व उपाययोजना जीवितहानी टाळण्यासाठी करण्याचे आवाहनही तालुका कृषी विभागाने केले आहे.