संगमनेर : विद्यार्थ्यांना प्रश्न पडतील, त्यांच्यात जीवनातील आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी शिक्षकांनी काम करणे गरजेचे आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा हे यश निर्माण करून देत असते. आपली पात्रता, क्षमता सतत उंचावण्यासाठी प्रयत्नांतून नवनवीन प्रयोगांची गरज आहे, असे मत लेखक प्रा. पंकज नागमोती यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शनिवारी (दि. ०८) ‘शिक्षकांची सर्जनशिलता’ या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डाॅ. भालचंद्र भावे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. विलास पांढरे उपस्थित होते. सर्जनशिलता निर्माण होण्यासाठी प्रश्न व शंका निर्माण होणे गरजेचे आहे. सर्जनशिलतेतून सामर्थ्य निर्माण होण्यासाठी स्वतः प्रेरणा देणे गरजेचे आहे.
प्रेरणेतून सर्जनशिलता निर्माण होत असते. प्रत्येक भावी शिक्षकाने यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, असेही प्रा. नागमोती म्हणाले. प्रास्ताविक डाॅ. भावे यांनी केले. व्याख्याते प्रा. नागमोती यांच्या परिचय प्रा. योगिता वाकचौरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. कविता काटे यांनी केले तर प्रा. राजू शेख यांनी आभार मानले.