राहुरी : राज्यातील चारही विद्यापीठांकडून नवनवीन वाण, नवनवीन तंत्रज्ञान प्रसारित केले जात आहे. कोरोनामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकºयांचे प्रश्न वाढलेले आहेत. कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी शास्त्रज्ञांनी प्रसार माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी व्यक्त केले.महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रसारमाध्यमांचा कृषी तंत्रज्ञान प्रसारात प्रभावी वापर या विषयावर रविवारी आॅनलाईन प्रशिक्षण आयोजित प्रशिक्षणाच्या उदघाटनप्रसंगी देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते. यावेळी डॉ. अशोक फरांदे, डॉ. प्रमोद सावंत, शिवाजी फुलसुंदर, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. मिलिंद अहिरे, सुभाषचंद्र शिंदे उपस्थित होते.बदलत्या हवामानामुळे शेतकºयांपुढील आव्हानामध्ये वाढ झाली आहे. शेतकºयांच्या मालाला बाजारपेठ मिळवणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच समस्या निर्माण झाल्यानंतर काय काळजी घ्यायची, हेही कळणे गरजेचे आहे, असेही देशमुख म्हणाले. डॉ. अशोक फरांदे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. प्रशिक्षणाचे आयोजन सचिव डॉ. मिलिंद अहिरे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन डॉ. सेवक ढेंगे यांनी केले तर आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. एकूण एक हजार प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली होती. डॉ. सचिन सदाफळ, कृषी विस्तार व संवाद विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोहर धादवड, डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. सेवक ढेंगे, मोहसीन तांबोळी व संदीप कोहकडे यांनी परिश्रम घेतले.
कृषी क्षेत्रात प्रसार माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्याची गरज; डॉ. राजाराम देशमुख यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 4:15 PM