कर्जत : पीएनबी घोटाळ््यातील नीरव मोदी याची नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे २२५ एकर जमीन असून, या जमिनीवर सोलर प्रकल्प उभा आहे. ईडीने येथील जमीन जप्त केली असून, त्याचा सोलर प्लँटही सील करण्यात आला आहे.नीरव मोदी याचा केवळ हि-यांचा व्यापार नसून, त्याची मुंबई येथे फायर स्टोन डायमंड प्रा. लि या नावाने कंपनी आहे. यामध्ये मुंबईतील हेमंतकुमार दयालाल भट यांच्यासह काही नामांकित लोकांचा विश्वस्त म्हणून सहभाग आहे. कर्जत शहरापासून अवघ्या ५ कि.मी अंतरावर खंडाळा गाव आहे. या गावानजीक मोठे डोंगर आहेत. या डोंगराचे क्षेत्र खंडाळा, गोयकरवाडी, कापरेवाडी, वाघनळी या तीन गावांच्या हद्दीत आहे. यामधील मोठा भाग खंडाळा गावात येतो. हा सर्व परीसर ५०० एकरांचा आहे, मात्र तो खासगी शेतक-यांच्या मालकीचा आहे. डोंगरावर दगड असल्याने येथे काही पिकत नाही. काही क्षेत्र वनविभागाचे आहे. डोंगरातील काही जमीन मुंबई येथील गोयल या व्यक्तीने सुरुवातीला काही स्थानिक शेतक-यांकडून २००८ मध्ये विकत घेतली आहे. गोयल यांनी त्यावेळी ही जमीन ५ हजार रुपये एकरापासून ते ३५ हजार रुपये एकर या भावाने खरेदी केली. त्यानंतर त्याने ही जमीन देशातील प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी याला विकली. त्याने ही जमीन ५० हजार रुपये एकर या बाजारभावाने गोयल यांच्याकडून खरेदी केली होती.मोदी याने कर्जत येथील २२५ एकर जमीन नीरव मोदी याच्या नावाने निम्मी व फायर स्टोन कंपनीच्या नावाने निम्मी जमीन खरेदी केली आहे. यासाठी या कंपनीमध्ये त्याच्यासह मुंबईतील अनेक नामवंतांचा समावेश आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील गटनंबर ३१, ३५, ३९/१, ५८, ५९,६१, ६२, ६३, ९६/३, ७०/१, ७०/२, ८/१ व ८२ असे क्षेत्र हे नीरव मोदी आणि फायर स्टोन कंपनीच्या नावाने घेतली आहे. यामध्ये नीरव मोदी याच्या नावे १० हेक्टर ०७ आर ही जमीन आहे. तर कंपनीच्या नावे २८.५ हेक्टर चांगली व तितकीच पोटखराबा जमीन आहे.
- ईडीने घेतला ताबा
- या सर्व जमिनीच्या व्यवहाराची माहिती तपासात मिळाल्यानंतर ईडीचे दोन अधिकारी कर्जत येथे बुधवार व गुरूवार दोन दिवस तळ ठोकून होते. गावाचे कामगार तलाठी सुजाता गुजवटे यांच्याकडून त्यांनी जमिनीचे सातबारा घेतला. तसेच याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीच्या दस्त्याची पाहणी केली. त्यानंतर खंडाळा येथे जमीन व तेथील सोलर प्रकल्पाची पाहणी केली. तेथील कंपनीच्या कामगारांकडे विचारणा केली. त्यानंतर जमीन तसेच प्लँट जप्त करण्यात आला. हा सोलर प्लँट खंडाळा हद्दीमध्ये ३५ एकर क्षेत्रात व कापरेवाडी क्षेत्रामध्ये २५ एकर जागेत आहे. रविवारी दुपारी प्लँटणी पाहणी केली असता एकही कर्मचारी हजर नव्हता.
- नीरव मोदी कर्जतला आला नाही
- नीरव मोदी याने कर्जत येथे २२५ एकर जमीन विकत घेतली. मात्र तो एकदाही कर्जतला आला नाही. त्याला ही जमीन कोठे आहे किंवा कर्जत कोठे आहे हेही माहित नाही. त्याने जीमन खरेदीसाठी त्याच्या कंपनीतील सह्याचे अधिकार दिलेली व्यक्ती आणि वकिल येथे आले होते.
- कर्जत देशाच्या रडारवर
- हिरे व्यापारी नीरव मोदी याने केलेल्या बँक घोटाळ््यानंतर तो केवळ देशात नव्हेतर जगात प्रकाशात आला. त्याने नगर जिल्ह्यातील कर्जत येथे जमीन विकत घेतल्याचे उघड झाल्याने कर्जत तालुकाही देशाच्या रडारवर आला आहे. मोदी याने खंडाळा येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारला, मात्र खंडाळा ग्रामपंचायतीला त्याने एक रूपयाचाही कर भरला नाही. यासाठी खंडाळा येथील संतोष माने या युवकाने अनेकदा ग्रामसभेत ठराव मांडून तसा पत्रव्यवहार केला, परंतु मोदी याने या पत्राला केराची टोपली दाखवली.