शिर्डी : श्रीरामपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णावर उपचार करणाऱ्या प्रवरा ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकातील ३६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.
श्रीरामपूर येथील एका रूग्णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या रूग्णाने ४ एप्रिल रोजी प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार घेतले होते. त्यामुळे संबधित व्यक्तीचा अहवाल येताच त्याच्यावर उपचार करणाऱ्या पीएमटीतील डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासह ३६ जणांचे स्त्राव सोमवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज, बुधवारी या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह या सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. या मध्ये आठ डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, रूग्णवाहिका चालक, सुरक्षा रक्षक, वॉर्डबॉय, स्ट्रेचर हॅन्डल करणाऱ्याचा समावेश होता. या सर्वांना आता चौदा दिवसांसाठी प्रवरा ग्रामिण रूग्णालयात उभारण्यात आलेल्या कक्षात क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे कुंदन हिरे यांनी सांगितले.