लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : परदेशातून आलेल्या नगरमधील पाच प्रवाशांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार निगरानीखाली ठेवले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. त्यामुळे कोरोनाबाबत अफवा पसरवू नये, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.कोरोना विषाणूबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत जिल्हाधिकाºयांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. केवळ खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले. १ मार्च रोजी दुबईवरून जे चार नगरकर आले होते, ते एकाच कुटुंबातील आहेत. त्यांची तपासणी करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्याप्रमाणे आरोग्य विभागाने तपासणी केली असता, त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना त्यांच्या घरीच आरोग्य पथकाच्या निगरानीखाली ठेवले आहे. तसेच १३ दिवसांपूर्वी इटलीहून केडगाव येथील तरूण आला होता. तोही निगरानीखाली आहे. कोरोना रूग्णाच्या संपर्कात कोणी आले असेल तर त्याला कोरोनाची लागण झाली किंवा कसे हे पाहण्याचा कालावधी १४ दिवसांचा असतो. जे नगरकर दुबई व इटलीवरून आले आहेत, त्यांना अनुक्रमे ११ व १३ दिवस झालेले आहेत. आणखी दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यावरील निगरानी काढून घेतली जाईल. दुबईहून आलेल्या कुटुंबातील दोन मुले नंतर शाळेत गेली होती. खबरदारी म्हणून त्या शाळेतील मुलांचीही तपासणी केली आहे. सुदैवाने सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप एकही रूग्ण नाही, हे स्पष्ट झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.
विदेशातून आलेल्या पाच जणांचा अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:11 PM