ज्ञानेश दुधाडे -अहमदनगरगर्भगिरी पर्वत रांगेत शेकडो वर्षांपासून दिमाखात उभा असणारा मांजरसुंबे गड आजही पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहे. नगर शहरापासून अवघ्या २० किलोमीटर असणाऱ्या या गडाला ऐतिहासिक, भौगोलिक महत्व असून या ठिकाणी प्रशासनाने लक्ष दिल्यास हा गड पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विशेषकरून या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या आजही सर्वांसाठी कुतुहलाचा विषय ठरणार आहे. नगर तालुक्यात वांबोरीरोडवर गर्भगिरी पर्वत रांगेत गोरक्षनाथ गडाशेजारी मांजरसुंबे गड आहे. निजामशाहीच्या काळात सलाबत खान नावाच्या सरदाराने हा गड बांधलेला आहे. औरंगाबादकडून होणाऱ्या मोगल स्वाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडावरून टेहळणी करण्यात येत होती. या ठिकाणी वांबोरीच्या दिशेने दिसणारे मंजर (दृष्य) अतिशय सुंदर होते. त्यावेळी मुस्लीम सरदार ‘मंजर ए सुभा’ असे या ठिकाणाला म्हणत होते. पुढे याच मंजर ए सुभाचे मांजरसुंबा झाले असावे, असे म्हटले जाते.या गडावर दोन बुरू ज असून एका पडलेल्या महलाचे अवशेष आहेत. या महालाच्या भिंती आजही या गडाच्या रुबाबाची साक्ष देत आहेत. महालाच्या भिंतीशेजारी साधारण २०० फूट लांब आणि १०० फूट रुंद आणि साधारण ८ फूट खोल एवढा मोठा तलाव आहे. या तलावात वांबोरीच्या बाजूने गडाच्या डोंगरात असणाऱ्या पाण्याच्या टाक्यातून हत्तीच्या मोटेव्दारे पाणी उपसा करण्यात येत होता. गडावर दोन बुरूज आणि एका महालाचे अवशेष शिल्लक आहेत. महालाच्या दोन भिंती शिल्लक आहेत. मात्र, भिंतींची उंची २० फुटापेक्षा अधिक आहे. या ठिकाणी दावल मलिक हे पिराचे ठिकाण आहे. बुुरूज आणि महालाच्या भिंतीवर अनेक प्रेमवीरांनी आपली नावे कोरून त्या ठिकाणी विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी अनेक संस्था, तरूण गु्रप यांनी श्रमदान करून गडाची डागडुजीचा प्रयत्न केलेला आहे. दुष्काळातही पाणी असणाऱ्या टाक्यावांबोरीच्या दिशेने गडावरून २० ते २५ फूट खाली डोंगर कोरून त्या ठिकाणी पाच पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या टाक्यांतील पाणी हत्तीच्या मोटेने गडावर उपसण्यात येत होते. हा वास्तूशास्त्रचा अद्भूत नमुना आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अरूंद वाट असून अनेक ठिकाणी पायऱ्या कोसळलेल्या आहेत. या पाण्याच्या टाक्यात दुष्काळातही मुबलक पाणीसाठा असतो. टाक्यांची स्वच्छता झालेली नसल्याने शेवाळ साचले आहे.
विकासापासून मांजरसुंबे गड उपेक्षित
By admin | Published: July 11, 2016 12:38 AM