पाथर्डी : तिसगावला (ता. पाथर्डी)पाणी पुरवठा करणाऱ्या मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून महिनाभरापासून पाणी आले नाही तसेच गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाचीआंबा तलावाजवळील विहिरीतून बेकायदा पाणी पुरवठा होत असल्याने तिसगावकर पाणी पाणी करीत आहेत. याकडे प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ तिसगाव गणाचे पंचायत समिती सदस्य, तिसगावचे सरपंच, उपसरपंचासह दहा सदस्यांनी मंगळवारी सामूहिक राजीनामे तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे दिले आहेत.तिसगाव पाथर्डी तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव असून गावाची लोकसंख्या सुमारे १३ हजार आहे तसेच गावात मोठी व्यापारपेठ असल्याने पंचक्रोशीतील गावातील नागरिक रोज कामानिमित्ताने तिसगाव येथे येतात. परंतु महिन्यापासून मिरी-तिसगाव नळयोजनेला पाणी न आल्यामुळे तिसगावकर पाण्यासाठी दाही दिशा फिरत आहेत. मिरी-तिसगाव योजनेची नवीन पाणी वाटप समिती झाल्यापासून तिसगावकरांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. पांढरीपूलपासून पुढील गावे पाणी स्वत:च वळवून घेत असल्यामुळे पुढील गावांना पाणी येत नाही तसेच तिसगाव येथे पाचीआंबा तलावाजवळ ग्रामपंचायतीची विहीर आहे, परंतु येथे रोज लाखो लीटर पाण्याचा बेकायदा उपसा होतो. त्यामुळे तिसगावकरांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. सध्या तिसगावात पाचशे लीटर पाण्याला दीडशे रुपये मोजावे लागतात. प्रशासनाकडे पाणी योजनेचे पाणी मिळावे तसेच ग्रामपंचायतीने विहीर अधिग्रहीत करण्यासंबंधी दाखल प्रस्तावाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ तिसगाव गणाचे पंचायत समिती सदस्य काशीनाथ लवांडे, सरपंच विजया लवांडे, उपसरपंच इलियास शेख, सदस्य रफीक शेख, भाऊसाहेब लोखंडे, भाऊसाहेब लवांडे, सचिन साळवे, अंबादास शिंदे, अनिता खंडागळे, उमा इंगळे, सुमित्रा पुंड यांनी पदाचे राजीनामे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. एकतर तिसगावकरांचा पाणीप्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा आमच्या राजीनाम्याचा स्वीकार करावा, असे निवेदनात स्पष्ट म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
By admin | Published: April 26, 2016 11:19 PM