नेवासा : शहरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नेवासा शहर हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा ही १८ एप्रिल पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तर संपर्कातील १९ जणांना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिली.नेवासा शहरात सोमवारी आणखी एक करोना बाधित रुग्ण आढळला असल्याचा अहवाल आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. सकाळी दहा वाजल्यापासून प्रशासनाने नेवासा शहर संपूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील सर्व दवाखाने, बँका, किराणा दुकाने, मेडिकल दुकाने, तसेच भाजीपाला विकणारे यांनाही दुकाने बंद करण्यास सांगितले.दरम्यान सोमवारी दुपारी पॉझिटिव्ह आलेला रुग्ण राहत असलेल्या परिसरात पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,पोलीस निरीक्षक रणजित डेरे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख तसेच आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, डॉ. रवींद्र कानडे,डॉ. बागवान, सोमनाथ यादव, रामेश्वर शिंदे यांनी भेट देऊन सर्व माहिती घेतली.कोरोनाबाधित नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णाचा कुठे संपर्क आला याची माहिती घेतल्यानंतर सर्व संपर्क आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला.नातेवाईकांसह एकोनाविस व्यक्तींना दुपारी चार वाजेच्या सुमारास नगरला तपासणीसाठी हलविण्यात आले.लॉक डाऊनमध्ये संपूर्ण नेवासा शहर तसेच नेवासाफाटा रस्त्यावरील नेवासा न्यायालयापर्यंत पूर्ण नाकाबंदी असणार आहे. रस्त्यावर कुणीही फिरू नये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वेळ प्रसंगी वाहने ही जप्त करण्यात येतील. शहरातील किराणा, मेडिकल,दूध,भाजीपाला या सर्व वस्तू नेमून दिलेल्या दुकानदारांना मोबाईलवर फोन केल्यानंतर घरपोहोच मिळतील. दरम्यान स्वछता सेवा,पाणी पुरवठा सेवा,अग्निशमन सेवा,विद्युत वितरण,सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापना यांना लॉक डाउनमधून वगळण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी दिली.
नेवासा शहर हॉटस्पॉट जाहीर, पुढील पाच दिवस संपूर्ण शहर शंभर टक्के बंद राहणार, १९ जणांना तपासणीसाठी पाठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 8:21 PM