नेवासा : तालुक्यातील मुरमे व बकुपिंपळगाव शिवारात प्रवरा नदीपात्रात वाळू उत्खनन करणारे दोन जेसीबी व एक ट्रॅक्टर असा ३६ लाखांचा मुद्देमाल नागरिकांच्या साहाय्याने महसूल पथकाने जप्त केला. याबाबत कामगार तलाठी अण्णा भीमराज दिघे यांनी दिलेल्या फियार्दीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरमे व बकुपिंपळगाव शिवारात नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणारे जेसीबी नागरिकांनी पकडले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दूरध्वनी द्वारे दिल्यानंतर कामगार तलाठी दिघे, मंडलाधिकारी सुनील लवांडे, कोतवाल रामभाऊ मोरे हे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्या ठिकाणी गेले असता तेथे दोन जेसेबी व एक ट्रॅक्टर नदी पत्रात उभे होते. त्यावेळी अंकुश बंदिवान, धनु काशीद, सुनील डौले, राहुल थोरात, प्रदीप पटारे व इतर नागरिक तेथे होते. सदरचे जेसेबी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्खनन केलेली वाळू ही ट्रॅक्टर मध्ये भरण्याच्या तयारीत होते. या ठिकाणाहून एम एच २० एटी ९७०७ व ६१६९ क्रमांकाचे दोन ढंपर पळून गेल्याचे सदर नागरिकांनी सांगितले. तसेच जेसीबी व ट्रॅक्टर मालक राजू देवीचंद चरवंडे(परदेशी) व तुषार देवीचंद चरवंडे(परदेशी) यांच्या मालकीचे आहेत. त्यामध्ये दोन जेसेबी ३० लाख रुपये व ६ लाखाचा ट्रॅक्टर असा ३६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे फियार्दीत म्हटले आहे.दिलेल्या फियार्दीवरून राजू चरवंडे ,तुषार चरवंडे , जेसेबी, ट्रॅक्टर वरील अज्ञात चालक व ढंपर वरील अज्ञात चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा : अवैध वाळू उत्खननप्रकरणी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 3:18 PM