नेवासा : सोमवारी तालुक्यातील सलाबतपूर,जळके, गिडेगाव येथील ६० व्यक्तीच्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये सोळा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले आहेत. उर्वरित ४४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले.
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे मागील दोन दिवसात सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील साठ व्यक्तींची नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी, नेवासा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर मोसिन बागवान यांच्या वैद्यकीय पथकाने रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.
यामध्ये सलाबतपूर येथील चौदा,गिडेगाव येथील एक व जळके येथील एक असे सोळा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले तर उर्वरित चौवेचाळीस व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधीत सोळा व्यक्तींना उपचारासाठी नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान रविवारी रात्री सोनई येथील अकरा व्यक्तींना कोविड केअर सेंटर डिस्चार्ज देण्यात आला आहे.