नेवासा : तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान झाले. सरासरी ८१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर ४६७ सदस्यपदासाठी एकूण १०१९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दिघी येथे सर्वाधिक ९४ टक्के, तर सर्वात कमी सोनई येथे ६४ टक्के मतदान झाले.
तालुक्यातील महत्त्वाच्या सोनई, बेलपिंपळगाव, चांदा, कुकाणा, सलाबतपूर, देवगाव यांसह ५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी जोर लावला आहे.
दुपारी १२ पर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दुपारनंतर मात्र काही ठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला पाहायला मिळाला. ५२ ग्रामपंचायतींसाठी एकूण १९४ बूथवर १ लाख वीस हजार आठशे दहा मतदारांपैकी ९८ हजार पाचशे मतदारांनी हक्क बजावला.
मंत्री शंकरराव गडाख, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सोनई येथे, तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगाव, तर माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी कुकाणा येथे मतदानाचा हक्क बजावला.
तालुक्यात दुपारी साडेअकरापर्यंत ३६ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजता ५६ टक्के झालेल्या मतदानाने साडेतीन वाजेपर्यंत ७२ टक्क्यांचा आकडा पार केला.
सोनई ६४ टक्के, बेलपिंपळगाव ८०, चांदा ७६, देवगाव ८५, कुकाणा ७९, प्रवरासंगम ८५, सलाबतपूर ८० टक्के इतके मतदान झाले.
जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक नितीन मुंडावरे यांनी तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार नारायण कोरडे, संजय परदेशी, राजेंद्र गायकवाड, विजय नेमाने यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.