नेवासा : तालुक्यात विविध प्रकारची विकासकामे करून नेवासा तालुका राज्यात अग्रेसर बनवायचा आहे, असे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी केले.
बेलपिंपळगाव गटातील ४४ लाखांच्या विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांचे शुक्रवारी अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.
गडाख म्हणाले, तालुक्यातील अनेक वाडी-वस्ती, गावे यांना जोडणारे रस्ते मजबुतीकरण व खडीकरण कामे होऊन गावातील ग्रामस्थ शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटणार आहेत. बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये रस्ता कामाचा अनुशेष होता. तो अनुशेष मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांच्या नेतृत्वाखाली भरून काढला जाणार आहे. गटातील मोठी विकासकामे मार्गी लागतील. प्रत्येक गावामध्ये विकासकामे झाली पाहिजेत. विकासकामे करत असताना सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
घोगरगाव येथील घुमनदेव रस्ता मजबुतीकरण खडीकरण, बेलपांढरी येथील कनगरे वस्ती मुरूमीकरण, भालगाव ते गोधेगाव रस्ता ते गुप्ताई माता मंदिर रस्ता खडीकरण, भालगाव वाडी अंतर्गत रस्ते, तनपुरे वाडी ते गुप्ताई रोड, बकूपिंपळगाव शिवारातील देवगड फाटा ते पांढरे वस्ती मुरमीकरण आदी कामे मार्गी लागली.
यावेळी मुळा कारखाना संचालक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र शेरकर, कैलास झगरे, इकबाल शेख, संदीप सुडके, संजय लोखंडे, अशोक रुपनर, खंडू थोरात महेश मते, भीमाशंकर वरखडे, सुरेश गोरे,चांगदेव थोरात, सुरेश पांढरे, गणेश भोरे, भास्कर नलवडे, शिवाजी मते, लालचंद मते आदी उपस्थित होते.