नेवासा : येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील अतिक्रमणे बुधवारी (दि.८) प्रशासनाने अखेर हटविली. चोवीस तासांच्या नोटिसा देत जलदगतीने झालेल्या कारवाईने अतिक्रमणधारकांची चांगलीच धांदल उडाली.गत दोन दिवसापूर्वी येथे एका टपरीचे अतिक्रमण झाल्याने मोठा वाद झाला होता. यामुळे रस्ताच बंद झाला होता. यावेळी चांगलीच हमरी-तुमरी झाली. त्यामुळे अखेर प्रशासनाने खमकी भूमिका घेऊन एका दिवसात २३ अतिक्रमणे जमिनदोस्त केली.तहसील कार्यालय, पोलीस ठाणे एकाच आवारात असल्याने येथे तालुक्यातील नागरिकांचा मोठ्या संख्येने वावर असतो. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार येथेच होतात. त्यामुळे येथे डीटीपी, टाईपिंग व्यवसायाची उलाढाल चांगली होत असल्याने दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत गेली. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. दोन महिन्यापूर्वी एका अधिकाऱ्यालाच अरेरावीची भाषा करण्यात आल्याने प्रशासन आक्रमक झाले. आठ दिवसात सर्व अतिक्रमणे हटवण्याच्या चार नोटिसा संबंधितांना देण्यात आल्या. त्यानंतर काहीसा तडजोडीचा मार्ग काढण्याची विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यानंतर मोहीम थंडावली होती.परंतु, दोन दिवसांपूर्वी अचानक रात्रीतून एक टपरी येथे दाखल झाली. टपरी थेट रस्त्यात गेल्याने तहसील कार्यलयाचा रस्ता बंद झाला. त्यावरून अधिकारी आक्रमक झाले व मंगळवारी या परिसरातील सर्व २३ अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन चोवीस तासात जागा खाली करण्याचे बजावण्यात आले. बुधवारी प्रशासनाने जेसीबी आणून तयारी केली. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली. दुपारनंतर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा, नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे आदी उपस्थित होते.कारवाईचा निषेध..एका राजकीय व्यक्तीच्या उपद्व्यापामुळे ही कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे सामान्य व गरीब व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. महसूल प्रशासनाने सामंजस्याची भूमिका न घेतल्याने या कारवाईचा निषेध करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान यांनी सांगितले.जिल्हाधिका-यांसोबत चर्चा करून अतिक्रमणधारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. - रूपेश सुराणा, तहसीलदार, नेवासा
नेवासा तहसील आवारातील अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 10:32 AM