अहमदनगर : नवी मुंबई येथील जुईनगर भागात बँक आॅफ बडोदाच्या शाखेत बँकेच्या शेजारील दुकानामधून भुयार खोदून बँकेतील ३० लॉकर फोडल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील बँकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बँकांसमोर भुयारी चोरीचे नवे संकट उभे राहिले आहे. मुंबईच्या घटनेने बँकांनी अंतर्गत व बाह्य सुरक्षेचा मंगळवारी आढावा घेतला. सुरक्षेबाबत बँकाही सतर्क झाल्या असल्या तरी सध्याच्या सुरक्षेबाबत बँका अत्यंत निष्काळजी असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून आढळून आले.नवी मुंबईतील बडोदा बँकेची लॉकर्स रूम फोडल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने मंगळवारी काही बँकांची चाचपणी केली असता भुयार खोदून लॉकर्स फोडून चोरी करण्याच्या प्रकारावर उपाययोजना करणे सध्या तरी बँकांच्या आवाक्यात नसल्याचे दिसते.
नगर जिल्हा बँकेत धोक्याची घंटा शाखाधिका-याच्या घरी
नगर जिल्हा बँकेने मात्र सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केल्याने या बँकेच्या काही शाखांमधील धोक्याची सूचना देणारी घंटी थेट शाखाधिका-याच्या घरी वाजू शकते, अशी व्यवस्था केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अहमदनगर जिल्ह्यात २८६ शाखा व १० विस्तार कक्ष अस्तित्वात आहेत. त्यांची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे काम वर्षभरापासून बँकेने हाती घेतले आहे. बँकेच्या ज्याठिकाणी स्वत:च्या इमारती आहेत अशा शाखांमधील स्ट्राँग रूमचे बांधकाम काँक्रिटचे करण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा स्ट्राँगरूम फोडणे अशक्यच असते. पण मुंबईतील घटना ही अनपेक्षितपणे घडलेली दिसते. चोरट्यांनी हा एक नवाच मार्ग शोधलेला दिसतो. अशा अचानक होणा-या घटनांना आवर घालणे तसे अवघडच आहे. पण जिल्हा बँकेतील लॉकर्स, तिजो-यांना कोणताही स्पर्श झाला तरी त्याचा सायरन थेट संबंधित शाखेच्या शाखाधिका-याच्या निवासस्थानी वाजेल, अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे. काही शाखांमध्ये हे काम पूर्ण झाले आहे. तर काही शाखांमध्ये ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय जिल्ह्यातील या शाखांचे सायरन थेट अहमदनगरमधील बँकेच्या मुख्य कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येत आहे. त्यामुळे एखाद्या ग्रामीण भागातील शाखेतील तिजोरी अथवा लॉकर्सशी छेडछाड झाल्यास त्याचा सायरन थेट नगरच्या नियंत्रण कक्षातही वाजू शकणार आहे. त्या पद्धतीचे सेन्सर बँक शाखांमध्ये बसविण्यात येत आहेत. नवी मुंबईतील घटनेच्या पार्श्वभूमीवर स्ट्राँग रूमच्या सुरक्षा व मजबुतीकरणाबाबत सर्वच बँकांना विचार करावा लागणार आहे, असे जिल्हा बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
सुरक्षेबाबत बँका निष्काळजी
सुरक्षेबाबत बँका निष्काळजी असल्याचे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एका जबाबदार वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले. बँकांमध्ये २४ तास वॉचमन नसतात. एटीएम उघड्यावर आहेत. बँकांच्या ५० टक्के एटीएममध्ये २४ तास सुरक्षा रक्षक नसतात. त्यांच्याकडे बंदुकीऐवजी काठी असते. त्यामुळे एटीएम उचलून ते गाडीत घेऊन गेले तरी बँकांना पत्ता लागत नाही. बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसते. भिंतीचे काँक्रिट तोडून, गॅस कटरच्या सहाय्याने तिजोºया तोडल्या जातात. लॉकरच्या रूममध्ये भिंती जाड व काँक्रिट असतात. लॉकर, तिजोरीच्या खालूनही सिलिंग केले जाते. सशस्त्र रक्षक नेमले जात नाहीत. तेवढा पगार त्यांना न मिळाल्याने काठी असलेले रक्षक बँकांमध्ये असतात. यामुळे बँकेची सुरक्षा धोक्यात आहे.
सुरक्षेची पूर्णपणे काळजी
बॅँक आॅफ बडोदामधील लॉकरमध्ये ग्राहकांनी त्यांच्या ठेवलेल्या वस्तू पूर्णपणे सुरक्षित आहेत. बॅँकेत असलेले लॉकर पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविले गेले आहेत. बॅँकेच्या व ए.टी.एम. च्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाय योजना करण्यात आल्याचे बॅँक आॅफ बडोदाच्या शाखाधिकाºयांनी सांगितले. काही बॅँकांच्या अधिकाºयांशी फोनद्वारे संपर्क केला असता त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने माहिती देण्यासाठी मर्यादा असल्याचे सांगत बोलणे टाळले. संगमनेरातील काही ठराविक बॅँकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना नसल्याचेही काही अधिकाºयांच्या बोलण्यातून निदर्शनास आले.
भुयारी चोरीचे बँकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे, ही बाब खरी आहे. अर्बन बँकेच्या सर्वच शाखांमधील स्ट्राँग रुमला चोहोबाजूंनी क्राँक्रिटच्या भिंती आहेत. भिंतीची जाडी नऊ इंची आहे. सायरन यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. इलेक्ट्रीक सिस्टीम बसविण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही मार्गाने चोरी करण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही, अशी मजबूत यंत्रणा आहे. भुयारी मार्गाने चोरीचे नव्हे आव्हान निर्माण झाल्याने आणखी उपाय करण्याबाबत प्रयत्न करू.-खा. दिलीप गांधी, अध्यक्ष, नगर अर्बन बँकस्ट्रॉँगरूममध्ये लॉकर असून ग्राहकांसाठी असलेले लॉकर पूर्णपणे सुरक्षित आहेत. बॅँकेच्या व बॅँकेच्या बाहेर लागूनच असलेल्या ए.टी.एम. केंद्राच्या संरक्षणासाठी २४ तास सुरक्षा रक्षक कार्यरत आहे.-किशोर कुलकर्णी, शाखाधिकारी बॅँक आॅफ महाराष्टÑ, संगमनेर.