बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : छत्रपती शाहू महाराजांची पाठीवर थाप पडलेल्या काळू-बाळू तमाशाची लोकप्रियता आजही जुन्या रसिक पिढीच्या मनात रूंजी घालत आहे. तमाशा म्हटले ‘काळू-बाळू’ अन् ‘काळू-बाळू’ म्हटले की तमाशा असा कला क्षेत्रात आजच्या भाषेत एक ब्रँडच तयार झाला होता. पण आज दररोज मिळणारे उत्पन्न व होणाऱ्या खर्चाचा मेळ बसत नाही. त्यामुळे तरूण तमाशा शौकिनांच्या भावना विचारात घेऊन पुढील वर्षापासून ‘काळू-बाळू जल्लोश महाराष्ट्राचा’ नावाने लोकनाट्य क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून नवी वाट चोखाळणार आहे.या तमाशा मंडळाचे मालक विजय खाडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. लोककलेला नवी झळाळी देणारा काळू-बाळू हा राज्यातील पहिला तमाशा ठरणार आहे.
सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सातुजी खाडे यांनी सन १९०२ मध्ये तमाशा फडाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे चिरंजीव शिवा व संभा हे दिवसा कुस्त्यांच्या फडात कुस्त्या करायचे आणि रात्री तमाशात काम करायचे. त्यांची मुले लहू संभाजी खाडे (काळू) व अंकुश संभाजी खाडे (बाळू) यांनी बैलगाडीतील तमाशा ट्रक गाडीत आणला. लहू-अंकुश हे दोघेही दिसण्यास सारखे असल्याने त्यांचे नाव काळू-बाळू ठेवले. ही विनोदी जोडी तमाशा क्षेत्रात सुपरस्टार झाली. काळू बाळू तमाशा म्हटले की लोककलेचा आविष्कार होता. ‘जहरी पेला’ या वगाचे प्रयोग अनेक गावांमध्ये वन्समोअर झाले. आज त्यांच्या नव्या पिढीने काही बदल करून तमाशा क्षेत्रात काळू बाळूचा ब्रँड कायम ठेवला आहे. पण, इलेक्ट्रॉनिक माध्यमे गतिमान झाल्याने ग्रामीण भागातील लोककलेला त्याचा अधिक फटका बसला. अशा परिस्थितीत तमाशा फडाचे भवितव्य अंधारमय होऊन त्यांच्यासमोर धोक्याचा भोंगा वाजत आहे. काळू बाळू यांच्या परिवाराने तमाशा अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शिकलेले १५ तरूण स्त्री-पुरूष कलाकार लावणी, हिंदी-मराठी गाणी, जनजागृतीपर फार्स व वगनाट्ये सादर करणार आहेत. आमचे आजोबा शिवा व संभा खाडे कोल्हापूर जिल्ह्यात तमाशा करीत असताना त्यांनी शाहू महाराजांची भूमिका हुबेहुब केल्यामुळे त्यांच्यावर खुश होऊन महाराजांनी बिदागी व कपडे दिले होते. त्यांची जाणीव ठेऊन आमचे काम सुरू असल्याचे विजय खाडे म्हणाले.
असे असतील बदलमनोरंजन वाहिन्यांच्या धर्तीवर वगनाट्य, गीते बसविणार असून, त्यामध्ये अधिकाधिक शिक्षित तरुण स्त्री, पुरुष कलाकार असणार आहेत. वाद्यांसोबतच इतरही साधने अत्याधुनिक असणार आहेत.
हलगीवर थाप अन् बाळूवर अंत्यसंस्कारविनोद सम्राट बाळूचे (अंकुश खाडे) यांचे मिरजमध्ये निधन झाले. त्यावेळी लोणावळ्यात काळू बाळू लोकनाट्याचा प्रयोग होता. आम्ही गावकऱ्यांना विनंती केली या तमाशाचे मालक बाळू गेले, त्यामुळे आजचा खेळ रद्द करा, पण त्यांनी ऐकले नाही. यात्रेला आम्ही पाहुण्यांना काय दाखविणार? रात्री दहा वाजता आम्ही हालगीवर थाप टाकली अन् त्याचवेळी कवलापूर येथे बाळूच्या चितेला अग्निडाग देण्यात आला. त्या रात्री आम्ही मंचामागे गेलो की रडायचो अन् मंचावर आलो की हसायचो. प्रयोग संपल्यानंतर आम्ही कलावंत एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडलो. दुसऱ्या दिवशी आम्ही बाळूला सावडण्यासाठी कवलापूरला गेलो. हा प्रसंग सांगताना विजय खाडे यांना रडूच कोसळले.