श्री गोंदा विधानसभा मतदारसंघात मतदारांनी भाजपा उमेदवार दिलीप गांधी यांना ५८ हजारांचे विक्रमी मताधिक्य देऊन नवा इतिहास घडविला. नरेंद्र मोदींच्या लाटेत दोन्ही काँग्रेसच्या मनोमिलनाचे राजकारण साफ झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदेकरांनी दिलीप गांधी यांना २३ हजाराचे मताधिक्य दिले होते. या पंचवार्षिक निवडणुकीत मताधिक्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे, घन:श्याम शेलार, बाबासाहेब भोस यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळेंसाठी ताकदपणाला लावली. शरद पवार, छगन भुजबळ, आर.आर. पाटील, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात या स्टार प्रचारकांच्या सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. मात्र दिलीप गांधी यांच्या प्रचारासाठी विनोद तावडे वगळता एकही नेता फिरकला नाही. कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप, बाजार समिती सभापती बाळासाहेब नाहाटा, माजी जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी शेवटच्या टप्प्यात ‘नमो नमो’चा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला. मात्र युतीचे राजेंद्र म्हस्के, सुवर्णा पाचपुते, संतोष लगड, भाऊसाहेब गोरे, नंदू ताडे यांनी एकाकी झुंज दिली. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी यांना श्रीगोंद्यातून २३ हजाराचे मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांना २७ हजारांचे मताधिक्य मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी कोणाला मिळते? राष्टÑवादीच्या उमेदवारीसाठी कोणती खेळी होते? बंडाचे निशाण कोण हातात घेणार? यावर विधानसभेचा आखाडा गाजणार असला तरी ‘नमो नमो’चा धसका नेत्यांच्या मनात राहणार आहे. की फॅक्टर काय ठरला? लोकसभा निवडणुकीसाठी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांचे नाव सुरवातीला पुढे झाले होते. त्यादृष्टीने त्यांनी हालचालीही सुरु केल्या होत्या. परंतु नंतर वरिष्ठ पातळीवर पाचपुते यांचे नाव मागे पडून उमेदवारी राजीव राजळे यांना देण्याचा निर्णय झाला. या राजकारणाचे पडसाद प्रचारातही उमटत राहीले. स्वत: पाचपुते प्रचारात सक्रीय होते. तरीह त्यांच्या विश्वासहार्यतेवर पक्षातूनच संशय व्यक्त होत राहीला. राजीव राजळे यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा मतदार संघात स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या. त्यांनी ताकद पणाला लावली. शरद पवार यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. महायुतीचे दिलीप गांधी यांच्या प्रचारासाठी विनोद तावडे वगळता एकही नेता या मतदार संघाकडे फिरकला नाही. गांधी यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा मतदार संघात कोणत्याही स्टार प्रचारकाची सभा झाली नाही. खासदार दिलीप गांधी यांना गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीगोंदेकरांनी तारले मात्र विकासाचा आलेख न उंचावल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. गांधींविषयी असलेली नाराजी दूर ठेवत मोदींसाठी श्रीगोंदेकरांनी मताधिक्यांचा विक्रम केला. मोदी फॅक्टरचा फायदा गांधी यांना झाला. नगर येथे नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या प्रचार सभेच्या चर्चेचे लोण श्रीगोंद्यापर्यंत पोहचल्याचे निकालाने स्पष्ट केले.
मताधिक्याचा नवा विक्रम
By admin | Published: May 18, 2014 12:06 AM