नेवासा : माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने विष पिऊन आत्महत्या केली. मुलीने आत्महत्या केल्याचे समजताच तिच्या माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातून प्रेत ताब्यात घेऊन नेवासा पोलीस ठाण्यात आणून पोलिसांकडे फिर्याद घेण्यासाठी आग्रह धरला. फिर्यादीनंतर प्रेताचा अंत्यसंस्कार सासरच्या घरासमोर करून मुलीच्या सासरच्या घराला आग लावून दिली. या दोन्ही घटनेच्या परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, पती, सासरा व चुलत सासरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, तालुक्यातील बेलपांढरी येथील नवनाथ विठ्ठल गारूळे याचेबरोबर ११ महिन्यापूर्वी तालुक्यातील बºहाणपूर येथील सोनवणे कुटुंबातील सोनाली या मुलीचा विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसातच पाईपलाईनसाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी सुरू झाली. मागणी पूर्ण होत नाही म्हणून सोनालीस मारहाण करून शारीरिक, मानसिक छळ सुरू झाल्याने दि. १९ मे रोजी घरातील सर्वजण लग्नाला गेल्याचे पाहून दुपारी १२ ते १ वाजे दरम्यान या विवाहितेने घरातच विष घेतले. लग्नावरून घरचे लोक आल्यानंतर बेशुद्धावस्थेत पडलेल्या सोनालीस पाहून तिला लगेचच श्रीरामपूर येथील रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असता ती मरण पावली. आपली मुलगी विष पिऊन मयत झाल्याची बातमी कळताच तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली. पोलिसांनी प्रेत ताब्यात देताच प्रेत थेट नेवासा पोलीस ठाण्यात आणून फिर्याद घेण्याची मागणी करण्यात येऊन फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर प्रेताचा अंत्यसंस्कार सासरच्या राहत्या घरासमोर करण्याचे ठरवून राहत्या घरासमोर अंत्यसंस्कार करून घराला आग लावून देण्यात आली. मयत सोनालीचे वडील बाळासाहेब सोपान सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयताचा पती नवनाथ विठ्ठल गारूळे, सासरा विठ्ठल निळकंठ गारूळे, सासू छाया विठ्ठल गारूळे, चुलत सासू सविता श्रीरंग गारूळे, चुलत सासरा श्रीरंग निळकंठ गारूळे, पार्वताबाई निळकंठ गारूळे यांचे विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. तर लक्ष्मण सुभाष गारूळे यांनी राहते घर पेटून देऊन जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान केले म्हणून दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब सोनवणे, संतोष सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, दिगंबर सोनवणे व इतर १० ते ११ इसमांनी घर पेटून देऊन नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
नवविवाहितेची आत्महत्या
By admin | Published: May 21, 2014 12:04 AM