पारनेर : आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून सेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. जिल्हा सहकारी बँकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे. बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांनी केली.पारनेर-नगर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पारनेर येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे बोलत होते. आमदार विजय औटी, जयश्री औटी, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांचा ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, राणी लंके, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उपप्रमुख रामदास भोसले, गणेश शेळके, सुरेश बोरुडे, दत्तात्रय कुलट, शिवाजी बेलकर उपस्थित होते.निवडणुकीपुरते आम्ही शिवछत्रपतींचं नाव घेत नाही. ‘छत्रपतींचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा देत ते सत्तेत आले आणि निवडणुकीनंतर छत्रपतींविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लागले. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. जसा पक्ष तसा त्याचा प्रतिनिधी असतो. केंद्र सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. अच्छे दिन आले नाहीत. शेतक-यांची वाट लावली. जिल्हा सहकारी बँकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे. ती खरी शेतक-यांची बँक आहे. आज बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. आपण स्वबळावर पुढील निवडणुका लढणार आहोत. महाराष्ट्र मला भगवेमय झालेला पहायचाय. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे ठाकरे म्हणाले.
दारातल्या चपल्या हीच आपली संपत्ती
सेनापती बापट माझ्या आजोबांना म्हणजे केशवराव ठाकरे यांना भेटायला यायचे. आमच्या दादरच्या घरी बैठका व्हायच्या. घर छोटे होते. घराबाहेर चपलांचा खच पडला होता. तो चपलांचा खच आजोबांनी माझ्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना दाखविला आणि म्हणाले, हे काय आहे? वडील म्हणाले, चपला आहेत. तर आजोबा म्हणाले, ‘नाही. हे आपले वैभव आहे. एव्हढे लोकं आपल्याकडं येतात, तेच आपली संपत्ती आहे.’
स्वप्न दाखविणा-यांवर विश्वास ठेवू नका
२०५० साली शेतक-यांना दुप्पट भाव देऊ, २०२५ साली सर्वांना मोफत घरे देणार अशी घोषणा उद्धव ठाकरे करीत असतानाच लोकांनी टाळ्या वाजविल्या. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘अरे टाळ्या काय वाजवता? अशीच स्वप्ने दाखवूनच ते (भाजप) सत्तेत आले. केली का तुमची स्वप्ने पूर्ण? दिले का तुम्हाला अच्छे दिन? म्हणून सांगतो, भानावर या, अशा स्वप्न दाखविणा-यांवर विश्वास ठेवू नका.