शहर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक शनिवारी मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत लालटाकी येथील कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हाण, राजेंद्र नागवडे, संपतराव म्हस्के, फारुख शेख, उपाध्यक्ष खलील सय्यद, सरचिटणीस नलिनी गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे जाहीद शेख उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत भाजपला साथ देणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांविरोधात रोष व्यक्त केला. त्यानंतर थोरात यांनीही आमदार-महापौर काँग्रेसचाच होईल, असे सांगत कार्यकर्त्यांना बळ दिले. ते म्हणाले, नगर शहरातल्या विविध घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व ताकद उभी केली जाईल. किरण काळे या नव्या दमाच्या कार्यकर्त्याला शहराध्यक्षपद दिले. मात्र त्यांच्यापुढेही अडथळे तयार करण्याचा कार्यक्रम झाला; मात्र त्यांची घौडदोड सुरू असून ते चांगले काम करीत आहेत. राज्यातही भाजपकडून कुटील कारस्थान सुरू असले तरी राज्यातील सरकार आपला कार्यकाळ पाच वर्षे पूर्ण करेल.
यावेळी किरण काळे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना शहरात मात्र चुकीच्या पद्धतीने मित्रपक्ष वागत आहे. त्यामुळे काँग्रेस शहरामध्ये विरोधी बाकावर असून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहे. ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी माजी आमदार असीर सर यांच्यानंतर नगरमधून काँग्रेसच्या वतीने विधानसभेमध्ये जाण्याची क्षमता काळे यांच्याकडे असल्याचे सांगितले.
-------
राष्ट्रवादीवरच निशाणा महापालिकेत शिवसेना एक क्रमांकाचा पक्ष आहे. राष्ट्रवादीने साथ दिल्याने भाजपचा महापौर झाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर यात दुरुस्ती होऊन राष्ट्रवादीचे नेते भाजपची साथ सोडून शिवसेनेला सोबत घेतील, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त होत होती. त्यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत पाठपुरावा करण्यात आला;मात्र महापौरपद दूरच राहिले, स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्यावेळीही शिवसेनेला दोनदा त्यांचा उमेदवार मागे घ्यावा लागला. यावर बैठकीत चर्चा झाली. त्यामुळेच थोरात यांनी महापालिकेत केवळ मिशन-३५ नव्हे तर त्यापेक्षाही जास्त जागा जिंकून महापौरपदी काँग्रेसचाच नगरसेवक असेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच आमदारही काँग्रेसचाच होऊ शकतो, असे सांगून थोरात यांनी राष्ट्रवादीवरच निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली.
-----------
मंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे पायरीवरच
काहींना वाटले, आपण भाजपात गेले की मंत्री होऊ; पण मंत्री सोडाच त्यांना विधानसभेच्या पायरीवरच उभा राहायची वेळ आली. राजकारणात हीच खरी गंमत असते. डावपेच करायला जातात आणि स्वत:च फसतात. आम्ही कठीण काळात काँग्रेस सोबतच राहिलो, म्हणून मंत्रीपद मिळाले. विचारावर ठाम राहिले की भविष्यकाळ आपलाच असतो, असे सांगत मंत्री थोरात यांनी अप्रत्यक्षपणे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली.
--
फोटो