जामखेड : जामखेड नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्षपदी निखिल मुकुंद घायतडक यांची म्हणून शुक्रवारी निवड निश्चित झाली आहे.शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत घायतडक यांचेच दोन अर्ज दाखल झाले. अन्य कुणाचाही अर्ज न आल्याने घायतडक यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निश्चित झाली आहे. बुधवारी औपचारिक घोषणा होईल. पालिका स्थापनेनंतर नगराध्यक्षांचा अडीच वर्षा कालावधी ८ आॅगस्टला संपुष्टात येत आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या सव्वा वर्षासाठी घायतडक यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी घायतडक यांनीच दोन उमेदवारी अर्ज भरले. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अडीच वर्षांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम १ आॅगस्ट रोजी होणार आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या पदाकरीता निखिल घायतडक व विद्या वाव्हळ हे दोघे स्पर्धेत होते. पालकमंत्री राम शिंदे हे कोणाला संधी देतात. याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. शेवटच्या क्षणी पालकमंत्री राम शिंदे यांनी निखिल घायतडक यांचे नाव जाहीर केले. त्या पाश्र्वभूमीवर नगराध्यक्षपद पदासाठी अखेरच्या दहा मिनिटांत निखिल घायतडक यांनी दोन नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे दाखल केले.निखिल घायतडक यांच्या नामनिर्देशन एका पत्रावर स्पर्धक उमेदवार विद्या वाव्हळ सुचक, अनुमोदक म्हणून सही आहे. तर दुस-या नामनिर्देशन पत्रावर ऋषिकेश बांबरसे यांची सुचक, अनुमोदक म्हणून सही आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर लगेचच छाननी करून दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. नगराध्यक्ष पदासाठी निखिल घायतडक यांचेच दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित आहे. आता केवळ औपचारिकता बाकी आहे.जामखेड नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटल्याने आता उपनगराध्यक्ष पदाची निवड एक आॅगस्टला नगराध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर होणार आहे. या पदासाठी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांच्यासह चौदा नगरसेवक इच्छुक आहे. यासाठी पालकमंत्री राम शिंदे कोणाला कौल देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.