पारनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. त्यातील शंभर बेडला ऑक्सिजनची सुविधा आहे. बुधवारी (दि.१४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी याचे लोकार्पण होणार आहे.
मागील वर्षीही लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथे एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारले होते. भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालयात बुधवारी सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे. भाळवणी येथील भुजबळ कुटुंबाने कोविड सेंटरसाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले आहे.
--
रूग्णांना मिळणार अशा सुविधा..
अकराशे बेडचे कोविड सेंटर आहे. त्यातील शंभर बेड ऑक्सिजनचे असतील. प्रत्येक रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाॅटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा समावेश असेल. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढे दिले जाणार आहेत.
--
मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रूग्ण आढळत आहेत. जनतेची होणारी हेळसांड लक्षात घेऊन अत्याधुनिक, सुसज्ज असे ‘शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर ’ या नावाने पुन्हा एकदा भाळवणी येथे कोविड सेंटर सुरू करीत आहे. गेल्या वर्षी कर्जुले हर्या येथे आदर्शवत कोविड सेंटर सुरू केले होते. त्याची पोहोच पावती म्हणून ‘लोकमत’ने ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ या पुरस्कारने सन्मानित केले.
-निलेश लंके,
विधानसभा सदस्य, पारनेर-नगर मतदारसंघ