पारनेर : सर्व कोरोना रुग्णांची सेवा करण्याचे व्रत आमदार नीलेश लंके यांनी माणुसकीच्या भावनेतून स्वीकारले आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा एक नवा आदर्श त्यांनी महाराष्ट्रापुढे उभा केला आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढले.
आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या १ हजार १०० बेडच्या शरद पवार आरोग्य मंदिरास पाटील यांनी शनिवारी रात्री भेट दिली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ॲड. राहुल झावरे, जितेश सरडे, बापू शिर्के, राजेंद्र चौधरी, चंद्रकांत मोढवे, राजेश्वरी कोठावळे, दत्ता कोरडे, बाळासाहेब खिलारी, संदीप चौधरी, डॉ. बाळासाहेब कावरे, बाळासाहेब दळवी, संतोष भुजबळ, प्रमोद गोडसे, संदीप रोहोकले, सहदेव तराळ, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, जिथे संकट येतील तिथे धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार लंके यांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून कोरोना रुग्णांसाठी धावून जाण्याचे काम केले आहे. या आरोग्य मंदिराविषयी आजवर केवळ ऐकत होतो. येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर ते रुग्णांची किती सेवा करीत आहे याची जाणीव झाली. त्यांचा आम्हाला अभिमान आहे.
---
मीदेखील डॉक्टर झालोय
गेल्या वर्षभरापासून मी कोरोना रुग्णांची सेवा करतोय. हजारो रुग्णांशी संपर्क आल्याने रुग्णास काय औषधोपचार करावा लागेल याचा मलाही चांगला अनुभव आलाय. कोरोनाची व माझी दोस्ती झालीय. माझी भेट झाल्यावर रुग्ण पन्नास टक्के बरा होतो. अनुभवातून मीदेखील डॉक्टर झालोय, असे यावेळी आमदार लंके यांनी सांगितले.
---
२३ भाळवणी पाटील
भाळवणी येथील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर मार्गदर्शन करताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील.