अहमदनगर : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे कालवे बंदिस्त पाईपलाईनद्वारे व्हावेत, या मागणीसाठी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसह आमदार वैभव पिचड यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली.अकोले तालुक्यातील कालवेग्रस्त शेतकरी अल्पभूधारक आहेत. सध्या कालवा जात असलेल्या जमिनी पूर्ण बागायती आहेत. त्यामुळे बागायती जमिनी वाया जाणार आहेत. शिवाय माती कालव्यातून पाणी वाहून नेल्यास ४० टक्के पाण्याचे बाष्पीभवन व पाझर होऊन नुकसान होणार आहे. कालव्यांचा देखभाल खर्चही खूप आहे. कालव्यांच्या आतील ७ हजार हेक्टर जमीन भविष्यात पाणथळ, दलदलीची क्षारपड होऊन नापीक होईल.त्यामुळे ६४ हजार हेक्टर क्षेत्र निळवंडेच्या पाण्यावर उघड्या कालव्यांनी बागायती करणे अशक्य होणार आहे. ही विशेष बाब लक्षात घेता माती कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपलाईनद्वारे कालवे काळाची गरज आहे, अशी आग्रही मागणी पिचड यांच्यासह शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांसमोर मांडली. निळवंडे २ प्रकल्पाला मान्यता १९९२साली मिळाली, परंतु यासाठीचे भूसंपादन मात्र त्याआधीच सुरू झाले होते, या नियमबाह्य कृतीकडे पिचड यांनी जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले.आंदोलनाची खरी धार आता वाढत चालली आहे. त्यामुळे कोणीही नकारात्मक विचार करू नये, आपल्या मागण्या प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचल्या आहेत. आता शासनापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे व त्या दिशेने तयारी करणे गरजेचे आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. शासनाला बंदिस्त कालवे नेण्यास भाग पाडूच, असा विश्वास पिचड यांनी बैठकीनंतर बोलून दाखवला.यावेळी बाळासाहेब वाळुंज, भाऊसाहेब धुमाळ, देवीदास धुमाळ, बंडू हासे, शरद हासे, दौलत मालुंजकर, विनोद चौधरी, चंद्रभान देशमुख, बाळासाहेब घोडके, आत्माराम मोरे, सहादू आरोटे, खंडू वाकचौरे आदी उपस्थित होते.
निळवंडेचे कालवे बंदिस्तच व्हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 4:48 PM