कोेपरगाव : पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकार निळवंडे धरणातून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी देईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरूवारी येथे दिली.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिीट्यूट कार्यस्थळावर बागडे यांनी आपत्ती निवारण पथकाचे उद्घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव कोल्हे होते. महंत रमेशगिरी महाराज, दत्तात्रय कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, संजय सातभाई, दिलीप दारूणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, गटनेते योगेश बागुल रवींद्र पाठक, भाजप शहराध्यक्ष कैलास खैरे आदी उपस्थित होते.बिपीन कोल्हे म्हणाले, ब्रिटीश काळापासून तालुका अवर्षणग्रस्त असल्याने बारमाही गोदावरी कालव्यांची निर्मिती करून पाटपाणी दिले. मात्र कायमस्वरूपी पाणी मिळण्यावर सरकारने भर द्यावा. निळवंडे धरणातून शिर्डी व कोपरगावला पिण्याचे पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून अध्यादेश काढला. मात्र काही विघ्नसंतोषी शुक्राचार्य पाईपलाईनला अडथळा आणत आहेत. देव त्यांना सुबुध्दी देवो. शहराला पिण्याचे पाणी मिळो, अशी टिपण्णी त्यांनी केली.कोल्हे यांनी शाल, हार-तुरे, गुच्छ न स्वीकारता शालेय साहित्य व वृक्षांचे वाटप केले. आमदार स्नेहलता कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी फाऊंडेशनचे सुमित कोल्हे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी स्वागत केले. मच्छिंद्र टेके यांनी प्रास्ताविक केले. प्रशासकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आपत्ती निवारण पथकाविषयी माहिती दिली. प्रा. साहेबराव दवंगे यांनी सूत्रसंचालन केले. भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी आभार मानले.
शहर व मतदार संघातील पिण्यासह शेतीचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी पक्ष बदलला. गेल्या निवडणुकीत नवीन पक्ष असूनही कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिल्यानेच आमदारकी मिळाली. निळवंडे धरण कालवाप्रश्नी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ न देता राखीव साठ्यातून शिर्डी व कोपरगावला पिण्याचे पाणी घेत आहे. मात्र काहींनी वावड्या उठवून चालविलेला विरोध निरर्थक आहे. युती सरकारच्या माध्यमातून १० वर्षातील विकासाचा बॅकलॉग आपण भरून काढला आहे.-स्नेहलता कोल्हे, आमदार.आमदार स्नेहलताताई, तुम्ही चिंता करू नका. तुमचे सर्व प्रश्न सभागृहात मांडा. त्यासाठी सभापती या नात्याने भरपूर वेळ देईल.-हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष.