अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांनी सोमवारी जिल्हा न्यायालयात सहा जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे़तत्कालीन उपअभियंता अशोक मुक्ताजी पवळे, उपअभियंता हरिष मानाजी विधाते, शाखा अभियंता रफीक सफी शेख, ग्रामसेवक विठ्ठल प्रभाकर गोरे, ग्रामसेवक जयसिंग तुकाराम औटी, तत्कालीन सरपंच छाया छगन पाटोळे यांच्यावर या दुर्घटनेचा दोष ठेवण्यात आला आहे़ निंबोडी येथे २८ आॅगस्ट २०१७ रोजी गावातील प्राथमिक शाळेची पाचवीची वर्ग खोली पडून तीन विद्यार्थी ठार झाले होते. तर चौदा विद्यार्थी जखमी झाले होते. या दुर्घटनेत वैष्णवी प्रकाश पोटे, सुमित सुनील भिंगारदिवे, श्रेयस प्रवीण रहाणे या तीन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. प्रकाश पोटे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला शाळेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, गटविकास अधिकारी व तत्कालीन अधिकारी यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतून वर्ग खोलीच्या बांधकाम संबंधी अहवाल मागवला होता.जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार तत्कालीन उपअभियंता अशोक मुक्ताजी पवळे, उपअभियंता हरिष मानाजी विधाते, शाखा अभियंता रफीक सफी शेख, ग्रामसेवक विठ्ठल प्रभाकर गोरे, ग्रामसेवक जयसिंग तुकाराम औटी, तत्कालीन सरपंच छाया छगन पाटोळे यांच्या काळात हे बांधकाम झालेले आहे. १९९८-२००० या काळात हे बांधकाम झाले असल्याने या सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे. नित्कृष्ट बांधकाम झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे़ मृत्युस कारणीभूत ठरणे (३०४ अ), सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न (३०८) करणे हे कलम लावण्यात आलेले आहेत.
निंबोडी शाळा दुर्घटना प्रकरण : सहा जणांविरोधात दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 6:29 PM