- अरुण वाघमोडेअहमदनगर - राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी येथील ‘निर्भया’ हत्याकांडातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने येरवडा कारागृहात रविवारी पहाटे गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना समोर येताच सात वर्षांपूर्वीच्या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. मुंबई उच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी पूर्ण होण्याआधीच निर्दयी आरोपीने शेवटी फाशी घेऊनच मृत्यूला कवटाळले, अशा प्रतिक्रिया कोपर्डी ग्रामस्थांसह सर्वस्तरातून उमटल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील नववीत शिकणाऱ्या निर्भयावर १३ जुलै २०१६ रोजी जितेंद्र शिंदे याने अत्याचार करत तिचा अमानुषपणे खून केला होता. शिंदे याने केलेल्या कृत्यात याच गावातील संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांचाही सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर कर्जत पोलिसांनी या तिघांनाही अटक केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी दि. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
दिवसही जात नाही तिच्या आठवणीविना- जिल्हा न्यायालयात आरोपीला फाशीची शिक्षा झाली; मात्र अद्यापपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. - माझ्या छकुलीचे लचके तोडणाऱ्या मुख्य आरोपीने कारागृहात फाशी घेतली. शेवटी माझ्या बाळाला देवानेच न्याय दिला. - तिला जाऊन आज सात वर्षे झाली; मात्र आमचा एक दिवसही तिच्या आठवणीविना जात नाही, अशी भावना निर्भयाच्या माता-पित्यांनी व्यक्त केली.
खटल्यावर काहीही परिणाम होणार नाहीकोपर्डी खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. खटल्यातील एक आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केल्यानंतरही खटल्यावर काहीही परिणाम होणार नाही. उर्वरित आरोपींविरोधात खटला सुरूच राहणार आहे. सध्या या खटल्याच्या तारखा पडतात; मात्र नियमित सुनावणी सुरू झालेली नाही. थोड्याच दिवसांत ही सुनावणी नियमित होईल. - ॲड. उमेशचंद्र यादव, विशेष सरकारी वकील