आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील निशा वागसकरने दहावीत ९१.६० टक्के गुण मिळवत मोलमजुरी करुन मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट घेणाऱ्या आईला मधूर फळ मिळवून दिले. घरची बेताची परिस्थिती तसेच येणा-या अडचणींवर मात करुन निशाने मिळविलेले यश वडाळीसारख्या ग्रामीण मुला, मुलींना प्रोत्साहन देणारे ठरले आहे.पतीची साथ सुटल्यानंतर वडाळी येथील शोभा वागसकर यांनी घरच्या जेमतेम शेतीबरोबरच मिळेल त्यांच्या शेतात मोलमजुरी करुन मुलगी आणि मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरविले. शिक्षणाशिवाय परिस्थितीत बदल होणार नसल्याचे ओळखून दहावीतील निशाला अभ्यासासाठी प्रेरणा दिली. निशानेही रोज पहाटे उठून सर्वांचा स्वयंपाक आणि किरकोळ कामे करुन अभ्यास केला. सुट्टीच्या दिवशी आईच्या साथीने मोलमजुरीही केली. घरी पडेल ते काम केले.कामासाठी वेळ गेला तरी नित्यनेमाने रोजचा अभ्यास करुन खासगी शिकवण्यांशिवाय फक्त शाळेतील शिक्षकांच्या जोरावर ९१.६० टक्क््यापर्यंत मजल मारली. वडाळीच्या माध्यमिक विद्यालयात निशा अव्वल ठरली. आणि आई शोभा यांच्या कष्टाचे चीज झाले. आता पुढील शिक्षणासाठी आणि मुलीचे अभियंता बनण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी कष्ट करण्याची तयारी केली आहे. तसेच नववीतील मुलासाठी मोठ्या बहिणीचे यश प्रेरणास्थानी असणार आहे. निशासारख्या सामान्य कुटुंबातील मुलीने मिळविलेल्या यशामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचेही मनोबल उंचावले असून अव्वल स्थानासाठी खासगी शिकवणीची गरज नसल्याचे अधोरेखित झाले आहे.