योगेश गुंड । लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव : निजामशाहीकालीन ऐतिहासिक वास्तुंचे वैभव असणाºया भातोडी परिसरातील कलावंतीणीचा महाल व मांजरसुंबा येथील मर्दानखाना पर्यटनाच्या सुविधांपासून वंचित राहिला आहे. सध्या या दोन्ही ऐतिहासिक वास्तुंना देखभालीअभावी अवकळा आली आहे. मर्दानखान्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने इतर सुविधांबाबत काय अपेक्षा करणार हा प्रश्न आहे. पायाभूत सुविधांपासून हे दोन्ही परिसर दुर्लक्षित राहिल्याने पर्यटकांनी येथे येण्यास पाठ फिरवली आहे.हिरवाईने नटलेला परिसर व जमिनीपासून सुमारे २ हजार ९०० फूट उंचीवर मांजरसुंबा येथील उंच डोंगरावर निजामशहाच्या काळात मर्दानखाना नावाची वास्तू बांधण्यात आली. मांजरसुंबा येथील डोंगरावर बांधलेला हा महाल मांजरसुंबा गड या नावानेच ओळखला जातो. या गडाशेजारी जलविहारासाठी तयार केलेला तलाव, त्यात पाणी भरण्यासाठी हत्ती मोट, स्नानासाठीचा हमामखाना अशी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. नगरपासून २० किलोमीटर अंतरावर डोंगरगण आणि गोरक्षनाथगडाच्या मध्यभागी असलेल्या या डोंगरावर निजामशाहीतील बादशहांच्या विश्रांतीसाठी हा महाल बांधण्यात आला. हाच परिसर येथील निसर्गरम्य परिसरामुळे ‘नगरचे महाबळेश्वर’ म्हणूनही ओळखला जातो. मात्र निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे येणाºया पर्यटकांसाठी काहीच सुविधा उपलब्ध नाहीत. या ऐतिहासिक वास्तुंची मोठी पडझड झालेली असून हा मर्दानखाना नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या महालाची पडझड झाल्याने काही भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत. उर्वरित भिंतींकडे वेळीच लक्ष न दिल्यास ही वास्तू कधीही नामशेष होऊ शकते. मर्दानखान्याचा बहुतांशी भाग ढासळला आहे. निसर्गरम्य, आरोग्यदायी वातावरण व हवा पालटण्यासाठी विश्रांतीचे ठिकाण म्हणून या वास्तुची उभारणी करण्यात आली. निजामशाही सुरक्षित राहावी, परकीय सत्तांचे आक्रमण होऊ नये म्हणून टेहाळणी करण्यासाठीही या वास्तुंचा उपयोग केला गेला. या महालावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यटक येतील कसे? त्यातच वर येणाºयांना पाणी, वीज, सावली या कुठल्याच सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. याच मांजरसुंबा गडावर पॅराग्लायडिंग व ट्रेकिंगसाठी हौशी पर्यटक येतात. येथेच काही चित्रपटांचे चित्रीकरणही झाले. सुटीच्या दिवशी तर पर्यटकांची मोठी संख्या येथे असते. महालाच्या समोरील बाजूस तीन कारंजी आहेत. डोंगरावर इतक्या उंचीवर तयार केलेला पोहण्याचा तलाव हे येथील वैशिष्ट्य समजले जाते. भातोडी परिसरातील कलावंतीणीच्या महालाचीही दुरवस्था झाली आहे. निजामशहाच्या काळात बांधलेली ही वास्तू मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महालाची पडझड झाल्याने त्या वास्तुचा आता फक्त सांगाडा उभा आहे. भातोडी गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. यामध्ये सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे नृसिंह मंदिर, ऐतिहासिक तलाव, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलते शरीफजीराजे भोसले यांची समाधी असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतिहास प्रसिद्ध भातोडीची लढाई याच परिसरात झाली होती. भातोडी ग्रामस्थांनी नृसिंह मंदिर व शरीफजीराजे भोसले यांची समाधी या दोन्ही स्थळांची देखभाल केली. यामुळे हा वारसा काही प्रमाणात जपला गेला. कलावंतीणीच्या महालामध्ये हत्तींना पाणी पिण्यासाठी मोठी बारव, रंगमहाल, राजमहाल, अतिथी महाल, पागा, छोटे छोटे तलाव होते. मात्र त्याचे आता केवळ अवशेष उरले आहेत.
निजामशाहीकालीन मर्दानखाना, कलावंतीणीच्या महालाला अवकळा ऐतिहासिक वास्तू भग्नावस्थेत : रस्त्याचे खस्ता हाल, महाल मोडकळीस; पायाभूत सुविधांअभावी पर्यटकांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 1:33 PM