पिंपळगाव माळवी : विवाह सोहळा म्हटला की हजारो व-हाडी मंडळींची उपस्थिती. बँड, बाराती..थाटमाट अन् जेवणावळीच्या पंगती असे चित्र समोर उभे राहते. परंतु पिंपळगाव माळवी येथे कोरोनामुळे सात जणांच्या उपस्थितीतच अत्यंत साध्या पध्दतीने विवाह सोहळा उरकला. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील प्रियांका बबनराव शिंदे व वळदगाव (ता.श्रीरामपूर) येथील अक्षय प्रकाश माळी यांचा विवाह सोहळा दोन महिन्यापूर्वी ठरला होता. परंतु कोरोनामुळे तो पुढे ढकलला होता. परंतु अक्षयतृतीयेच्या (दि.२६ एप्रिल) दिवशी अवघ्या सात जणांच्या उपस्थितीत पिंपळगाव माळवीत घरातच हा लग्नसोहळा उरकण्यात आला.प्रतिष्ठेला वा हौसेला फाटा देत व शासनाच्या संचारबंदी आदेशाचे पालन या लग्नसोहळ्यात करण्यात आले. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्ससिंग यांचे काटेकोर पालन करीत माळी व शिंदे परिवाराने हा लग्न सोहळा पार पाडला. या विवाहासाठी भाऊबंद, नातेवाईक, मित्र परिवार यांना आमंत्रण न देता वधूंच्या आई, वडिलांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी नवरदेव दुचाकीवरून वधूच्या घरी हजर झाला होता. विवाहनंतर नवरदेवाच्या दुचाकीवरून नवरीला सासरी पाठविण्यात आले. हा विवाह सोहळा परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
ना बँड...ना बाराती..सात जणांच्या उपस्थितीत घरातच उरकला लग्नसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 1:39 PM