अहमदनगर : महापालिकेतील बहुतांश बैठकांना नगरसेविकांच्यावतीने त्यांचे पतीराज किंवा चिरंजीव हजर राहत होते. नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी मात्र मंगळवारी होत असलेल्या कार्यकाळातील पहिल्याच बैठकीला फक्त नगरसेवकांना निमंत्रित केले आहे. यातून महापौर शेंडगे यांनी एकप्रकारे नगरसेविकांचे पतीराज व त्यांच्या चिरंजीवांना धक्काच दिला आहे. महिला नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेणाऱ्या शेंडगे पहिल्याच महापौर आहेत.
महापौर रोहिणी शेंडगे यांनी मंगळवारी महिला नगरसेवक व खाते प्रमुखांची बैठक बोलविली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत महिला नगरसेविकांना कळविण्यात आले आहे. तसा निरोप महापौर कार्यालयातून सोमवारी देण्यात आला. महापालिकेत ५० टक्के म्हणजे ३४ महिला नगरसेवक आहेत. परंतु, सभा वगळता इतरवेळी त्यांना पालिकेत एन्ट्री नसते. मनपातील बैठकांना नगरसेविकांच्या वतीने त्यांचे पतीराज किंवा मुले उपस्थित राहतात. मनपातील निर्णय प्रक्रियेत पतीराज व चिरंजीव सहभाग घेतात. त्यांच्या उपस्थितीवर कुणाची हरकत नसते. महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या दालनातही पतीराज व त्यांचे चिरंजीवांची ये-जा असते. मनपातील बैठकांना नगरसेविकांच्या वतीने त्यांचे पतीराज व चिरंजीव उपस्थित राहतील, असा शिरस्ता आहे. परंतु, महापौर शेंडगे यांनी पदभार स्वीकारताच महिला नगरसेवकांनीच बैठकीला येण्याचा आदेश दिला आहे. या माध्यमातून महापौर शेंडगे यांनी पतीराज व चिरंजीवांचा हस्तक्षेप थांबविण्याचा इशारा दिला असल्याची चर्चा आहे. महिला नगरसेवकांचे प्रश्न जाणून घेण्याबरोबरच त्यांनाही मनपाच्या कारभाराची ओळख व्हावी. निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी महापौर शेंडगे यांनी महिला नगरसेवकांची बैठक बोलविली आहे. त्यामुळे पतीराज व चिरंजीवांची चांगलीच अडचण झाली आहे.
...
काँग्रेसच्या नगरसेविकांना निमंत्रण नाही
महापालिकेत सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे. परंतु, महापौरांनी काँग्रेसच्या महिला नगरसेवकांना पहिल्याच बैठकीपासून दूर ठेवले असून, त्यांना बैठकीचे निरोप देण्यात आले नाहीत. यावरून काँग्रेसची फरपट सुरूच राहणार असल्याचे दिसते.