देवदैठण : नगर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे परजिल्ह्यातून नगर जिल्ह्यात येणा-या वाहनांची व प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. जे लोक पुणे, मुंबई व इतर रेड झोनमधून विनापरवानगी प्रवास करू इच्छितात, अशा वाहनांना प्रवाशांना मात्र नो एन्ट्री आहे. त्या वाहनांना परत माघारी पाठवले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात जिल्हाबंदीचा आदेश लागू झाल्यापासून गव्हाणेवाडी येथे बेलवंडी, शिरूर पोलीस यांचे संयुक्त तपासणी पथक नियुक्त केले आहे. काही दिवस पायी निघालेल्या मजुरांचे लोंढे व आता प्रचंड वाहनांची गर्दी होत आहे. सध्या अनेक लोक परवानगी घेऊन आपल्या वाहनातून इच्छीत ठिकाणी जात आहेत. तर काही अत्यावश्यक सेवा पुरवणारे आहेत. अशा वाहनांना विचारपूस करून पुढे सोडले जात आहे.
नगर जिल्ह्यात पर जिल्ह्यातून आलेले पाहुणे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे वाहन, प्रवासी तपासणी अधिक कडक केली आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला आहे. त्यामुळे या चेकनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत.
कर्जतचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, कर्जतचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ व त्यांचे पोलीस सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.