तळेगाव दिघे : दुष्काळी भागाकरीता आपण निळवंडे धरण पूर्ण केले. बोगदे व काही प्रमाणात कालव्यांची कामे केली. मात्र मागील पाच वर्षात या कालव्यांसाठी विद्यमान खासदारांकडून एक रुपयाचाही निधी आला नाही. काहीही काम झाले नाही. २२०० कोटी मिळाल्याची फक्त घोषणा असून विद्यमान खासदारांनी फक्त फोटोबाजी केली, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली. निळवंडेचे कालवे आपणच पूर्ण करु, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.शिर्डी लोकसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ निमोण, नान्नज दुमाला, चिंचोलीगुरव, तळेगाव दिघे येथे आयोजित बैठकांमध्ये थोरात बोलत होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, भाऊसाहेब कुटे, महेंद्र गोडगे, बी. आर. चकोर, गणपत सांगळे, प्रभाकर कांदळकर, नामदेव दिघे, सुभाष सांगळे, ज्ञानेश्वर सांगळे, साहेबराव गडाख, अविनाश सोनवणे, भारत मुंगसे, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, अनिल घुगे, साहेबराव आंधळे, जबाजी मंडलीक, सुदाम गायकवाड, दत्तू सांगळे, धनंजय मुंडे, विष्णू ढोले, तात्यासाहेब दिघे, अनिल कांदळकर, रंगनाथ मंडलीक, बबन कोटकर, देवराम गुळवे, रोहिदास सानप, भाऊपाटील कोटकर, प्रमिला बर्डे, विजय गोडगे, अॅड. केशव गोडगे आदी उपस्थित होते.आ. थोरात म्हणाले, मुंबईत राहिल्यामुळे त्यांना या भागाचे प्रश्न माहित नाही. दुसऱ्या अपक्ष उमेदवाराने दोन-तीन पक्षबदल केले. त्यांची पक्षनिष्ठा तपासा. सत्तेसाठी निष्ठा बदलणारी काही मंडळी आहे. त्यांनाही धडा शिकवा. निळवंडे हे मीच पूर्ण केले आणि ठामपणे सांगतो, कालवेही पूर्ण करणारच. बाबा ओहोळ, सचिन दिघे, महेंद्र गोडगे, बी.आर.चकोर, गणपतराव सांगळे, अविनाश सोनवणे यांचीही भाषणे झाली.
निळवंडेसाठी खासदारांकडून एक रुपयाचा निधी नाही : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:25 AM