भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, मंगेश त्रिभुवन, सुधीर शिंदे, किरण बोऱ्हाडे, स्वानंद रासने, नरेश सुराना, सोमराज कावळे यांनी यासंदर्भात प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांची भेट घेतली.
सध्या शिर्डीत साईबाबा संस्थानची दोन कोविड सेंटर आहेत. संस्थानने आपला संपूर्ण वैद्यकीय स्टाफ या कामासाठी लावला आहे. शिर्डीसह सगळीकडेच डॉक्टर्स, नर्सेस् व पॅरामेडिकल स्टाफची कमतरता आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून हे कर्मचारी जिवावर उदार होऊन अत्यंत तणावात काम करत आहेत. त्यातच शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. या कर्मचाऱ्यांवर जम्बो कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून अतिरिक्त ताण पडला, तर आहे ती सगळी यंत्रणा कोलमडण्याची भीती आहे.
बेचाळीसशे खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. या रुग्णालयासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री व वैद्यकीय स्टाफ कसा व कोठून उपलब्ध होईल, याबाबत खुलासा होणे आवश्यक आहे.
जम्बो कोविड रुग्णालय आजूबाजूच्या दहा तालुक्यांसाठी प्रस्तावित आहे. संस्थानची रुग्णालये पूर्णपणे कोविड करण्यात आल्याने अगोदरच इतर आरोग्यसेवा बाधित झाली आहे. त्यात जम्बो रुग्णालयामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढण्याचा व हॉटस्पॉट होण्याचा धोका आहे. त्याऐवजी संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर येथे पाचशे खाटांची कोविड सेंटर आहेत. त्यातच थोडी वाढ करावी म्हणजे एका ठिकाणी कामाचा व्याप वाढणार नाही व रुग्णांनाही गावाजवळच उपचार मिळतील. यासाठी संस्थानची थोडी मदत घेता येईल.
शिर्डी ४५ हजार लोकवस्तीचे ठिकाण असूनही येथे सध्या लसीकरणाची सुविधा बंद आहे. नागरिकांना लसीकरणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कोविड रुग्णालयांच्या कमतरता दूर कराव्यात व मोठ्या क्षमतेने लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना करण्यात आली.