योगेश गुंड ■ अहमदनगररस्त्यावर बेवारस फिरणार्या मनोरुग्ण महिलांच्या अंर्तमनाचा वेध घेतला आणि लयबद्ध संगिताच्या जोरावर भल्या-भल्यांना आपल्या तालावर थिरकायला लावणार्या मराठी चित्रपट संगितकार 'अजय-अतुल'ही नि:शब्द झाले. मनोरुग्ण अवस्थेतही मानवी वासनांच्या शिकार बनलेल्या या महिलांना पाहून 'स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्षे होऊनही आपल्या देशात असं होतं?' असा उलट प्रश्न करून आपल्या उद्विग्न भावना 'लोकमत'जवळ व्यक्त केल्या.माऊली सेवा प्रतिष्ठानच्या 'मनगाव' प्रकल्पाच्या भूमिपूजनाला आलेले आघाडीचे मराठी चित्रपट संगितकार 'अजय-अतुल' यांनी डॉ.राजेंद्र धामणे यांच्या मनोरुग्ण महिलांच्या प्रकल्पाला भेट दिली. रस्त्यावर बेवारस फिरणार्या या मनोरुण महिलांमध्ये कुणी उच्चभ्रू, तर कुणी उच्चशिक्षीत पण आपल्या मनाचे संतुलन बिघडल्याने त्यांना समाजव्यवस्थेने रस्त्यावर बेवारस टाकून दिलेलं, त्यांच्यातील कित्येक महिला पुरुषी वासनांना बळी पडलेल्या. या महिला आता डॉ.धामणे यांच्या प्रकल्पात उपचार व निवास करताहेत. संगीतकार 'अजय-अतुल' यांनी या महिलांचे अंतरंग जाणून घेतले आणि संगीतामधील सप्तसुर बेसूर व्हावेत, तशी त्यांच्या मनाची अवस्था झाली. 'लोकमत'ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मन सुन्न करणारी ही गोष्ट आहे. या महिलांचे जीवन पाहून आमचे मन बधीर झाले आहे. आमच्या मनात भावनांचा काय कल्लोळ सुरू आहे, हे शब्दांत न सांगण्यासारखे आहे. ज्या गोष्टींचा आयुष्यात कधीच विचार केला नाही, ज्याकडे कधीच लक्ष गेले नाही, असं विदारक चित्र आपल्या अवतीभोवती असू शकतं, यावर विश्वासच बसत नाही. पण अशा बेवारस, रस्त्यावर टाकून दिलेल्या या मनोरुग्ण महिलांना डॉ.धामणे दाम्पत्यांनी जो मायेचा आधार दिला आहे, जे काही करत आहेत, ते आमच्या कौतुकाच्या पलीकडचे आहे.एकीकडे आपल्या समाजात सारे ओरबाडून खाण्याची प्रवृत्ती आणि दुसरीकडे कुणा परक्यांसाठी काहीतरी करण्याची जिद्द याला आपल्याकडे शब्द नाहीत. अशा समाजात डॉ.धामणे यांच्यासारखी माणसे आहेत, याचाच अभिमान वाटतो. दुसर्यांसाठी सर्मपण करणे याच्यासारखी या जगात कुठलीच गोष्ट मोठी असू शकत नाही. दुसर्यांसाठी काहीतरी सर्मपण करण्यासाठी फक्त पैसा लागत नाही तर त्यासाठी मनाची दानत असावी लागते. 'समाजासाठी काहीतरी सर्मपण करण्याची प्रेरणा यातून आम्हाला मिळाली आहे. आमच्या भावना आम्ही 'व्हीडिओ' तयार करून पाठवू. आमची फुलाची पाकळी ही आम्ही यातून मांडू.''
■ डॉ. धामणे यांच्या माऊली प्रकल्पात मोनिका नावाची महिला आहे. ज्यावेळी अजय-अतुल तिच्यासमोर आले, त्यावेळी तिने चक्क अस्खलित इंग्रजीतून त्यांच्याशी संवाद साधला. तिचं इंग्रजी संभाषणचातुर्य पाहून दोघेही चकीत झाले. तिच्याशी संवाद साधत असतानाच ती मुळची भारतीय होती. तिला भारत सरकारने शिष्यवृत्ती दिल्याने ती रशियात उच्च शिक्षण घेत होती. मात्र भारतात आल्यानंतर ती मनोरुग्ण झाली. हे सगळं पाहून अजय-अतुल भावनाविवश झाले. अन उलगडला अर्पिता खानचा इतिहास■ संगीतकार अजय-अतुल यांनी आपल्या संवादात अर्पिता खानचा इतिहास या अनुषंगाने उलगडला. ते म्हणाले की, सलमान खानचे वडील सलीम खान रोज फिरायला जायचे. तेथे त्यांना एक मनोरुग्ण महिला दिसायची. ते तिला रोज खायला घेऊन जावू लागले. मात्र एक दिवस त्या महिलेच्या हातात कागदात गुंडाळलेले बाळ पाहून सलीम खान गोंधळले. त्या बाळाला जगवण्याची इच्छा त्या महिलेकडे दिसत नसल्याचे पाहून त्यांनी ते बाळ आपल्या घरी आणले. आपल्या मुलीप्रमाणे तिचे पालन-पोषण केले, तिला स्वत:चे नाव दिले. आपल्या सख्ख्या मुला-मुलींचा वाढदिवस कधी 'फाईव्ह स्टार' हॉटेलात केला नाही, पण तिचा केला. घरात स्वतंत्र खोली दिली. तिच अर्पिता खान नुकतीच थाटामाटात विवाहबद्ध झाली. सलीम खान सारखी माणसे दुर्मिळच भेटतात, असं भावनाविवश होऊन अजय-अतुल सांगत होते.