अहमदनगर : नगर तालुक्यातील लष्काराचे सराव क्षेत्र असलेल्या के के रेंजच्या विस्तारणीकरणासाठी नगर, राहुरी, पारनेर तालुक्यातील शासकीय जमिन लष्कराकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यामुळे या तीनही तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाधित होतील, असा आरोप करीत या हस्तांतरणाला तिनही तालुक्यात विरोध आहे. आता नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हेही शेतक-यांच्या बाजुने मैदानात उतरले असून, सरकारदरबारी या जमिन हस्तांतरणाला विरोध करणार असल्याचे राम शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.नागपूरमधील कोराडी आणि अन्सारी येथील लष्कर क्षेत्रातील जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केली जाणार असून, त्याबदल्यात लष्कराच्या अहमदनगर येथील फायरिंग रेंजसाठी सरकारी जमीन दिली जाणार आहे. याबाबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह महसूल विभाग, पर्यटन विभाग, तसेच लष्कराच्या अधिका-यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. नगरच्या फायरिंग रेंजसाठी पारनेर, राहुरी व नगर या तीन तालुक्यांतील सरकारी जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री राम शिंदे यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, राहुरी-नगर मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले व मी शेतक-यांची जमिन लष्कारासाठी देण्यात येऊ नये, लष्कारासाठी वाढीव जमिन हस्तांतरीत केली जाऊ नये, यासाठी मंत्रालयात योग्य वेळी विरोध नोंदविणार आहोत़ तसेच याबाबत वरिष्ठांशीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील जमिन हस्तांतरण आपण होऊ देणार नाही, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या भरतीची चौकशी पारदर्शी होणार
जिल्हा बँकेच्या नोकर भरतीबाबत सर्व स्तरातून मोठा आक्षेप घेतला जात असून, याबाबत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे़ जिल्हा नोकर भरतीतील अनागोंदी ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणली़ त्यानंतर या भरतीला स्थगिती मिळाली़ आता या भरती प्रकरणाची चौकशी सुरु आहे़ याबाबत पालकमंत्री राम शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या भरतीची चौकशी पारदर्शी होणार आहे़