कुळधरण : राज्यात सन १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप शिवसेना सरकारमुळे कुकडीचे पाणी कर्जत तालुक्यातील शेतीसाठी मिळाल्याने हा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. सध्या राज्यात युतीचे सरकार असल्याने आगामी काळात कर्जत-जामखेड तालुक्याला वेळेवर व नियमानुसार कुकडीचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलनाची आवश्यकता भासणार नाही, असे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी कुळधरण येथे नागरी सत्कारास उत्तर देताना सांगितले.कुकडी प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी सुमारे चार हजार कोटी रूपयांचा निधी मिळवून दिल्याबद्दल कुळधरण येथे आयोजित नागरी सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. कर्जत तालुका दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्रीधर पवार अध्यक्षस्थानी होते. कुळधरण व सुपेकरवाडी येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व उद्घाटन शिंदे यांच्याहस्ते झाले. यावेळी तालुका दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत,भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, प्रसाद ढोकरीकर, धनराज कोपनर, सरपंच अशोक सुपेकर, उपसरपंच भाऊसाहेब सुपेकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप सुपेकर, भिवसेन सुपेकर, अशोक सुपेकर आदी उपस्थित होते. पाटील, राऊत,खेडकर यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. वन विभागामार्फत ३५० लाभार्र्थींना गॅस जोड देण्यात आले. दादा खराडे यांनी प्रास्ताविक केले. निलेश दिवटे यांनी सूत्रसंचालन केले. विजय पावणे यांनी आभार मानले.
पाण्यासाठी आंदोलनाची गरज नाही : राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 3:47 PM