पाथर्डी : भगवानबाबांनी गड निर्माण केला आहे. गडापेक्षा कोणीही मोठा नाही. भगवानगड हा ऊर्जा स्थान आहे. २०१४ मध्ये माझ्या वाहनावर दगडफेक झाली. त्या दिवसानंतर आज भगवानबाबांनी मला न्याय दिला असून मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे, अशी भावना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.भगवानगडावर (ता. पाथर्डी) गुुरुवारी मुंडे यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मंत्री असलो तरी एक भक्त म्हणून गडावर आलो आहे. माझ्या हातून जनतेची सेवा घडावी. भगवानगडावर माझ्या वाहनावर दगडफेक झाली होती. मात्र भगवानबाबांनीच मला न्याय दिला आहे. बाबांची शक्ती व प्रेरणा मला अनेक वर्षापासून काम करण्याची ऊर्जा देत आहे. गड हे शक्तीपीठ असून मठाधिपतींना गडाच्या विकासासाठी मदत करणार आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगडावर येणा-या प्रत्येक व्यक्तीने गडाचा अन् भगवानबाबांचा भक्त बनून यावे. गड प्रत्येकाचे स्वागत करील. गडावर राजकीय भाषण बंदी कायम राहिल. यावेळी मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही-धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:56 AM