अहमदनगर : केडगावमध्ये झालेले दुहेरी हत्याकांड निषेधार्थच आहे. परंतु त्यानंतर जे राजकारण सुरू झालं ते दुर्दैवी आहे. जो तो नगरमध्ये येऊन नगरचा कसा बिहार झाला याचे दाखले देत आहे. परंतु नगरला विकासाचा मोठा वारसा आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हा विकासासाठी योगदान दिलेले आहे. राज्यात नगरकडे मानाने पाहिजे जाते. त्यामुळे कोणी राजकीय फायद्यासाठी नगरची बदनामी करू नये, अशी अपेक्षा खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली.
दिलीप गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, केडगाव येथे शिवसैनिकांची हत्या झाल्याने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नगरमध्ये येत त्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच पक्षाच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदतही केली. त्यांच्या या भूमिकेचे मी स्वागत करतो. परंतु त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच नगरची कायदा-सुव्यवस्था बिघडली असून, नगरचा बिहार झाल्याचे वक्तव्य केले. त्याचे मी खंडण करतो. कोणतेही विषय कोणत्याही ठिकाणी करणे चुकीचे आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी या जिल्हा विकासासाठी योगदान दिलेले आहे. राजकारणात आपला जिल्हा नेहमी दिशा देणारा ओळखला जातो. गेल्या काही दिवसांत नगरमध्ये ज्या घटना घडल्या त्या वैयक्तिक स्तरावरच्या आहेत. परंतु राजकीय फायद्यासाठी चुकीची वक्तव्ये करून कोणी जर जिल्ह्यातील ६० लाख जनतेला वेढीस धरत असेल तर ते चुकीचे आहे. राज्यात नगर जिल्हा उत्कृष्ट आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील राजकारणी परिवाराने कुठल्याही गुंडगिरीला समर्थन केलेले नाही. त्यामुळे नगरचे नाव कोणी बदमान करू नये, एवढीच आपली इच्छा आहे, असे गांधी म्हणाले.शिवसेनेकडे विकासाचा अजेंडा नसल्याने टीकागेल्या चार वर्षात केंद्र व राज्य हातात हात घालून विकासात्मक कामे करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामाचा धडाका लावला आहे. चांगल्या गोष्टी होत आहेत म्हणून वारंवार मुख्यमंत्र्यांवर टीका केली जाते. शिवसेनेकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर टीका करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न ते करतात, असा टोला गांधी यांनी शिवसेनेला लगावला.केडगाव प्रकरणाशी भाजपचा संबंध नाहीकेडगाव प्रकरण स्थानिक राजकारणातून घडले आहे. त्याचा भाजप पक्षाशी कोणताही संबंध नाही. यात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव जरी आले असले तरी ते पोलिसांना पूर्ण सहकार्य करीत आहेत. गुुन्हा दाखल झाल्यानंतर ते स्वत: पोलिसांत हजर झाले. पोलीस आपल्या परीने तपास करीत आहेत. सत्य काय ते बाहेर येईल.पालिका निवडणुकीत सेनेशी युती अशक्ययेत्या महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेबरोबर युती किंवा त्यांच्याबरोबर जाणार नाही. राज्यात कोठेही भाजपने सेनेशी युती केली, तरी नगरमध्ये ती होणार नाही, असे गांधी यांनी ठणकावून सांगितले. महानगरपालिकेत नगरसेवकांपेक्षा ठेकेदार जास्त झालेत , त्यामुळे शहरात विकासकामे रखडली, असेही ते शेवटी म्हणाले.