अरुण वाघमोडे
अहमदनगर: दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने शहरातील रहिवाशांसह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनाही वाहन पार्किंगला जागा पुरत नाही. पर्यायाने घरासमोरील रस्ते, चौकांत व दुकानांसमोर वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीसह अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. वाहतूक शाखेकडून कारवाई होत असली तरी रस्त्यावरील वाहनांची गर्दी काही कमी होताना दिसत नाही.
नगर शहराची लोकसंख्या सुमारे साडेपाच लाख इतकी आहे. केवळ नगर शहरातच दुचाकी आणि चारचाकी असे एकूण तीन लाखांपेक्षा जास्त वाहने आहेत. दिवसभरात जिल्हाभरातून शहरात येणाऱ्या वाहनधारकांची मोठी संख्या असते. शासकीय कार्यालये व बाजारपेठेत येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करून निघून जातात. बहुतांश शासकीय कार्यालयांत अधिकृत पार्किंग असली तरी ही जागा अपुरी पडते. शहरातील कापडबाजार, नवीपेठ, चितळे रोड, गंजबाजार, दाळमंडई, स्टेटबँक चौक, माळीवाडा परिसर, अमरधाम रस्ता, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, जुने न्यायालय परिसर, तख्ती दरवाजा आदी ठिकाणी नेहमीच रस्त्यावर वाहने दिसतात. त्यामुळे सततची वाहतूककोंडी आणि अपघतांना निमंत्रण मिळत आहे. नो-पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवर वाहतूक शाखेकडून कारवाई हाेत असली तरी रोजच्या परिस्थितीत काहीच फरक पडताना दिसत नाही.
-----------------------
वर्षभरात २२ हजार वाहनचालकांना दंड
नो-पार्किंगमध्ये वाहने उभा केल्याने मार्गील वर्षभरात जिल्ह्यातील २२ हजार ५८९ वाहनचालकांना पोलिसांनी ४५ लाख १७ हजार ८०० रुपयांचा दंड केला आहे. कलम १२२ अंतर्गत प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे हा दंड आकारला जातो.
---------------------------------
दिल्ली गेट, सर्जेपुरा ते कापडबाजार सर्वाधिक त्रासदायक
शहरातील दिल्ली गेट, सर्जेपुरा ते कापडबाजार हे रस्ते व परिसर सर्वाधिक वर्दळीचे ठिकाणे आहेत. येथे दुकानांसमोर वाहने उभी केली जात असल्याने नेहमीच वाहतूककोंडी होते. वाहनांसह विक्रेतेही रस्त्यावरच बसत असल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडते.
रहिवाशांचे वाहने गेटसमोर
शहरातील बहुतांश रहिवाशांना वाहने लावण्यासाठी घरासमोर व अपार्टमेंमध्ये पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे हे लोक गेटसमोरच दुचाकी व चारचाही वाहने लावतात. त्यामुळे शहरातील गर्दीच्या ठिकाणांसह अंतर्गत रस्त्यांवरही या वाहनांचा त्रास सहन करावा लागत आहे.
फोटो २९ पार्किंग