कोपरगाव : शहराच्या विस्ताराबरोबरच दिवसागणिक वाहनांच्या संख्येतदेखील कमालीची भर पडत आहे. मात्र नगरपालिकेचे एकही अधिकृत वाहनतळ शहरात नसल्याने सर्व रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होऊन रहदारीला अडथळा होतो़ अहमदनगर-मनमाड राज्यमार्गावर वसलेल्या कोपरगाव शहराला शिर्डीमुळे वेगळे महत्त्व आहे. शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे लाखावर पोहचली आहे. दुचाकी-चारचाकी वाहनांचा आलेख वाढता आहे. असे असताना वाहतूकव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. वाहतुकीच्या शिस्तीचा अभाव असल्याने मन मानेल, त्या ठिकाणी वाहने उभी करतात. वाहनांची प्रचंड वर्दळ पाहावयास मिळते. मेनरोड, गुरुद्वारा रोड, बँक रोड, धारणगाव रोड, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, न्यायालय परिसर, शिवाजी चौक, विघ्नेश्वर चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, संभाजी चौक, तेरा बंगले रोड, सुदेश चित्रपटगृह, सराफ बाजार, नेहरू भाजी मार्केट, येवला नाका, बसस्थानक परिसरात थेट रस्त्यावर वाहने उभी केली जातात. दुकाने, दवाखाने, बँका, बाजार, शासकीय-निमशासकीय कार्यालये, आदी सार्वजनिक ठिकाणी ये-जा करणाऱ्यांचा सतत राबता असतो.तालुक्याचे मुख्यालय व प्रमुख बाजारपेठ शहरात असल्याने ग्रामीण भागातून दररोज असंख्य वाहने येतात. ही वाहने कोठे उभी करावीत? असा प्रश्न वाहनधारकांना पडतो. पर्यायाने मिळेल त्या ठिकाणी वाहने लावली जातात. वाहने रस्त्यावर उभी राहिल्यास वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहने रेंगाळून चालकांना फटका बसतो. पालिकेने ठिकठिकाणी वाहनतळांची निर्मिती केल्यास चांगली सोय होऊ शकेल. (प्रतिनिधी)
‘नो पार्किंग झोनची’ एैशी-तैशी
By admin | Published: October 20, 2016 1:01 AM