राहुरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राहुरी तालुक्यात पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल बंद झाल्याने शेतीतील कामे ठप्प झाली आहेत. पेट्रोलसाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली होती.
कांदा काढणीनंतर शेतकऱ्यांची मशागतीसाठी लगबग सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता आहे. याशिवाय भाजीपाला, फळे त्यांच्यावर पडलेला रोग व किडीच्या फवारणीसाठी पेट्रोलची गरज आहे. पेट्रोल आणि डिझेल न मिळाल्याने फवारणीची कामे ठप्प झाली आहेत. पंप मालकांनी शेतकऱ्यांना शासकीय पत्र दाखवून पेट्रोल व डिझेल देता येणार नाही, असे सांगितले. शेतीची कामे बंद पडल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे.
कांदा, गहू, भाजीपाला दूध आदी शेतीमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांकडे डिझेल आणि पेट्रोल नसल्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांना प्रेट्रोल न मिळाल्याने गैरसोय झाली. शेतीसाठी डिझेल आणि पेट्रोल देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी व डॉक्टर संपाच्या माध्यमातून पेट्रोल वितरण सुरू होते. आदेशाची अंमलबजावणी पेट्रोल पंपाच्या माध्यमातून करण्यात आली. शेतीकामासाठी पेट्रोल मिळावे अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. - एफ. आर. शेख, तहसीलदार राहुरी