करंजी : प्रदूषण महामंडळाची परवानगी नाही, जमीन बिगरशेती केलेली नाही, शासनाच्या नियमानुसार मानवी वस्तीपासून ५०० मीटर अंतराची अट, असे नियम धाब्यावर बसवून पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस परिसरात काही वीटभट्ट्या सुरू आहेत. त्यातून येणाऱ्या धुरामुळे नागरिकांचे धोक्यात आले असून वीटभट्ट्या इतरत्र हलविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
घाटशिरस परिसरातील वीटभट्ट्यामुळे शिंदेवस्ती, वाघमारे वस्तीवरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या वीटभट्ट्यांमधून रात्रंदिवस निघणाऱ्या धुरामुळे वस्तीवरील परिसरातील नागरिकांना ताप, सर्दी, ॲलर्जी, श्वासोच्छवास तसेच डोळ्यांना त्रास होत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांनी पैशांच्या लालसेपोटी आपला व परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात घालून आपल्या जमिनी भाडेतत्त्वावर वीटभट्टी मालकास दिल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असणाऱ्या या वीटभट्ट्यांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्या इतरत्र हलविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी प्रकाश वाघमारे, मंदा पाराजी जाधव, आसाराम शिंदे, विजय सीताराम वाघमारे, पद्माबाई वाघमारे, प्रतिभाताई वाघमारे, बाबासाहेब वाघमारे आदींसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.