शिर्डी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वांचे प्रश्न सोडविणारे असल्याचे जनतेच्या लक्षात आल्याने जळगाव व सांगली महापालिकांची सत्ता भाजपाला मिळाली. मंत्रीमंडळात सामूहिक निर्णय होत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचा टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी शिवसेनेला लगावला. भाजपाने शिवसेनेबरोबर युती ठेवायची की नाही? याचा अंतिम निर्णय शिवसेनेलाच घ्यावा लागेल, असे सूतोवाच करीत त्यांनी चेंडू टोलावला.मुनगुंटीवार यांनी शनिवारी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधला. प्रारंभी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुनगुंटीवार यांचा सत्कार केला. पत्रकारांच्या प्रश्नांवर ते म्हणाले, चार-दोन लोकांच्या चर्चेने मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही. आणि ते शक्यही नाही. शिवसेनेशी २५ वर्षांची मैत्री कायम राहावी, ही भाजपा अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांची इच्छा आहे म्हणून भाजपा शिवसेनेशी स्वत:हून युती तोडणार नाही. लोकसभा एकत्रित लढवून भाजपा-सेनेला मोठे यश मिळाले. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आम्ही स्वतंत्र लढलो. याचा अर्थ भाजपाने शिवसेनेसारख्या जुन्या मित्राला सोडून दिले, असा होत नाही. शिवसेनेबरोबर युती तोडण्यासंदर्भात एकनाथ खडसे यांचे मत जळगावच्या निवडणूक निकालासंदर्भात असावे, अशी पुष्टी मुनगुंटीवार यांनी जोडली. मराठा समाजाला सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मराठा समाज शांतताप्रिय व पराक्रमी आहे. त्यांचा पराक्रम अठरा पगड जातीच्या उन्नतीसाठी राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर महाराष्ट्र चालला आहे. ९ आॅगस्टपासुन सुरू होणारे मराठा आंदोलन हे महापुरूषांच्या विचाराने व शांततेच्या मार्गाने व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शांततेच्या मार्गाने चाललेले मराठा समाजाचे आंदोलन अचानक हिंसक कसे झाले? या आंदोलनात कोणती बा' शक्ती आहे का? याचा तपास सुरू झाल्याचे मुनगुंटीवार यांनी स्पष्ट केले.