लोकमत न्यूज नेटवर्कखरडगाव (जि.अहमदनगर) : वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने सालवडगाव (ता.शेवगाव) येथील हनुमान वस्तीवरील माजी सैनिकाने थेट मुख्यमंत्र्यांकडे हेलिकॉप्टर घेण्यासाठी अर्थसाह्याची मागणी केली आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. दत्तू भापकर असे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.
शेवगाव तालुक्यातील सालवडगावपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर हनुमानवस्ती आहे. या वस्तीवर ३५० लोकवस्ती आहे. मात्र, सालवडगावपासून हनुमान वस्तीवर जाण्यासाठी सध्या रस्ताच नाही. जुन्या ओढ्यातून एक कच्चा रस्ता होता. मात्र, त्यावरही बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, रस्त्याचे काम सुरू होऊ शकले नाही. हा केवळ दोन किलोमीटरचा पाणंद रस्ता आहे.
शालेय विद्यार्थ्यांचेही होतात हालnसालवडगाव येथील हनुमान वस्तीवर येण्या-जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, शाळेत मुलांना जाण्यासाठी व एखादी व्यक्ती आजारी असेल, तरी वेळेवर वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत. यासाठी येथील सेवानिवृत्त लष्करी जवान दत्तू भापकर यांनी अनेक वेळा सरकारी दरबारी पाठपुरावा केला, परंतु त्यांनाही न्याय मिळालाच नाही. nअखेर त्यांनी वैतागून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मला रस्ता नसल्याने हेलिकॉप्टर घ्यायचे आहे. यासाठी मला सरकारी अनुदान द्यावे, अशी मागणी केली.