व्यापारी प्रकाश भगवानदास गदिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, लसीकरण करून घेण्याची नोटीस पालिकेने त्यांना बजावली होती. लसीकरण करून घेतले नसेल, तर आरटीपीसीआर चाचणी करून घेऊन निगेटिव्ह अहवालाचे प्रमाणपत्र सोबत बाळगण्याची सूचना गदिया यांना देण्यात आली होती. मात्र, असा अहवाल केवळ पंधरा दिवसांकरिता ग्राह्य धरला जाणार आहे.
या नोटिशीविरुद्ध गदिया यांनी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला. शहरातील व्यापाऱ्यांना नगरपालिका प्रशासनाने नोटिसा दिल्या, परंतु शहरात लसीकरणाची कोणतीही सुविधा निर्माण केली नाही. मुळात सर्वप्रथम शहरात सरकारी लसीकरणाची सुविधा निर्माण करणे, मुबलक लस उपलब्ध करणे पालिकेकडून अपेक्षित आहे. मात्र, असे न करता थेट नोटिसा पाठविणे चुकीचे आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे गदिया यांचे म्हणणे आहे.
याचिकेमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गदिया यांच्या वतीने अँड. मजहर जहागीरदार, ॲड.तुषार चौदांते, ॲड.सौरभ गदिया हे काम पाहत आहेत.
शहरातील अनेक राजकीय पक्षाचे नेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत, पालिकेच्या वतीने लसीकरण व कोरोना उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. या प्रश्नी घेरावो आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
----------