पाथर्डी : आपण इमानदारीची लढाई लढत असून ती शेवटपर्यंत लढणार आहे. सत्ता अस्थिर असते. धार्मिक व्यासपीठाचा वापर कोणीही राजकारणासाठी करू नये. राजकारण करायला अनेक जागा आहेत. हरिनाम सप्ताहात जयजयकाराच्या घोषणा ऐकून घेत स्वत:ला मिरवून घेणे मला आवडत नाही. कोणत्याही गडापेक्षा आपण मोठे नसतो हे समजणे गरजेचे आहे, अशी खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळून केली.चुंबळी (ता. पाथर्डी) येथे सुरू असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाला मुंडे गुरुवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. मुंडे म्हणाले, गेल्या १४ वर्षांपासून संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी पूजन करण्याचा मान मला महंतांकडून मिळत आहे. गहिनीनाथ गडाने मला मोठे केले. त्याची उतराई होणे शक्य नाही. आपल्या माणसांसाठी शक्ती मिळो, अशी मागणी मी करीत आहे. सध्या होत असलेले हरिनाम सप्ताहही पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांची सहनशीलता संपली आहे. शेतक-यांनी आता खंबीर व्हायला हवे. आपण सगळे मिळून जगण्याचा संघर्ष करू. त्यासाठी संत वामनभाऊ महाराज आपल्याला बळ देतील यावर विश्वास ठेवा असेही ते शेवटी म्हणाले.यावेळी गडाचे महंत विठ्ठल महाराज, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, ज्येष्ठ नेते दशरथ वणवे, राजेंद्र दौंड, माजी नगरसेवक चाँद मणियार, सीताराम बोरूडे, गहिनीनाथ शिरसाट, बाबासाहेब ढाकणे, बाळासाहेब दराडे उपस्थित होते.
गडापेक्षा कोणीही मोठा नाही - धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 9:00 PM